घरातील सततच्या वादाला कंटाळलेल्या मुलांनी साेडले घर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:13+5:302021-08-25T04:25:13+5:30
काेणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर काेणी घरातील वादाला वैतागले... घरातील परिस्थिती बेताची...त्यातच सतत हाेणारे भांडण, वाद याला कंटाळलेल्या अनेकांनी आपले ...

घरातील सततच्या वादाला कंटाळलेल्या मुलांनी साेडले घर !
काेणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर काेणी घरातील वादाला वैतागले...
घरातील परिस्थिती बेताची...त्यातच सतत हाेणारे भांडण, वाद याला कंटाळलेल्या अनेकांनी आपले घर साेडले आहे. या मुलांचा शाेध घेतला असता, काेणी बसस्थानक, रेल्वेस्थानक तर काेणी शहरात भटकंती करताना आढळून आले आहे.
काहीजण मायानगरीतील हाॅटेल्समध्ये काम करताना पाेलिसांच्या हाती लागले आहेत. या अल्पवयीन मुला-मुलींना पाेलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. घराबाहेर पडण्याची प्रत्येक मुला-मुलींची कारणे वेगवेगळी असल्याचे पुढे आले आहे.
माेठ्या शहरातील झगमगाट, चित्रपटातील नायक-नायिकांचे असलेले आकर्षण आणि बंगला-गाडीची असलेली ओढ या अल्पवयीन मुला-मुलींना घराबाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. घरात सतत टाेकल्यानेही अनेकांनी घर साेडले आहे.
म्हणून साेडले घर...
मुंबई मेरी जान...
हिंदी चित्रपटात दिसणारी मुंबई प्रत्यक्षात पाहण्यासाठी काहींनी थेट रेल्वेने मायनगरी गाठली. मात्र, परतीचा प्रवास माहिती नसल्याने या महानगरात रेंगाळले. पाेलिसांच्या शाेधमाेहिमेत भटकताना ते आढळून आले. अधिक चाैकशीनंतर त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
हैदराबाद गाठले...
लातूर, लातूर राेड आणि उदगीर रेल्वेस्थानकातून थेट रेल्वे पकडून काही मुलांनी हैदराबाद शहर गाठले. तेथे आल्यानंतर भाषेची अडचण आली. अशावेळी एका हाॅटेलात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, पाेलिसांच्या ऑपरेशन मुस्कानमध्ये ते हाती लागले. त्यांनाही कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
वाद-विवाद, आमिष आणि आकर्षणातून अनेक जण पडले घराबाहेर...
मित्रांशी असलेली संगत, प्रेमप्रकरण, साेशल मीडियावरून झालेली मैत्री यासह घरातील वाद-विवादातून अल्पवयीन मुले-मुली घराबाहेर पडल्याचे समाेर आले आहे. शिवाय, विविध आमिषांना ही मुले-मुली बळी पडले आहेत. यांचा शाेध घेतल्यानंतर आपण मुले-मुली आणि कुटुंबातील प्रमुख सदस्यांचे समुपदेशन करताे. हे वय कल्पनाविश्वात रमण्याचे असते. यासाठी अशा मुलांना अतिशय सकारात्मक हाताळण्याची गरज आहे.
- दीपाली गिते, सहाय्यक पाेलीस निरीक्षक, भराेसा सेल, लातूर