रेमडेसिविरचा काळाबाजार; सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:06+5:302021-05-01T04:18:06+5:30
लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज लागत आहे. त्याचा गैरफायदा ...

रेमडेसिविरचा काळाबाजार; सहा जणांना अटक
लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज लागत आहे. त्याचा गैरफायदा घेत काळाबाजारात त्याची विक्री होत आहे. याबाबतची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली. पथकाने २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बार्शी रोडच्या समांतर रस्त्यावर रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करीत असताना सहा जणांना पकडले. यात ऋषिकेश महादेव कसपटे (रा. वाल्मिक नगर), शरद नागनाथ डोंगरे (रा.विकास नगर, लातूर), ओम सुदर्शन पुरी (रा. एकुरगा), ओमप्रसाद हणमंत जाधव (रा. हिप्पळगाव), किरण भरत मुधाळे (रा. नंदी स्टॉप, लातूर) व सिद्धेश्वर राजेंद्र सुरवसे (रा. नंदी स्टॉप, लातूर) यांना अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी या प्रकरणी अन्न व औषधी प्रशासनाच्या विभागाकडून या औषधाची खात्री झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या सहा जणांकडून विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शिताफीने त्याचा तपास करून या आरोपींना अटक केली आहे. यातील काही जण विशिष्ट लॅबमध्ये कार्यरत आहेत. त्यांना हे इंजेक्शन कोठून उपलब्ध झाले. याबाबत तपास पोलीस करीत असल्याचे पीएसआय. कदम यांनी सांगितले.