ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:20+5:302021-06-27T04:14:20+5:30
लातूर : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूरमधील ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम
लातूर : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ओबीसी समाजाच्या आंदोलनाला सर्व समाजाचा पाठिंबा असल्याचे सांगत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृह, आरोग्य, कृषी यासह विविध विभागांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार निलंगेकर यांनी केला. मराठा आणि ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नसल्याने रद्द ठरले. या दोन्ही समाजाला आरक्षण मिळावे, हीच भाजपची भूमिका आहे. जोपर्यंत हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भाजपचा संघर्ष सुरुच राहणार आहे, असेही ते म्हणाले. ज्या-ज्यावेळी लातूरवर संकट आले तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो. सत्ताधारी नेते लातूरवर कोरोनाचे मोठे संकट आले त्यावेळी कुठे होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकारने मराठा आणि ओबीसींचे आरक्षण घालवले. एस. सी., एस. टी. पवर्गाची पदोन्नती थांबवली. रद्द झालेले आरक्षण परत मिळाले नाही तर सत्ताधाऱ्यांना ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड म्हणाले. आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब यांच्यासह कुठलाही समाज समाधानी नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर, देविदास काळे, भागवत सोट, स्वाती जाधव, प्रेरणा होनराव, व्यंकट पन्हाळे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शैलेश गोजमगुंडे यांनी केले. यावेळी शैलेश लाहोटी, प्रदीप पाटील-खंडापूरकर, मनीष बंडेवार, अजित पाटील-कव्हेकर, दिग्विजय काथवटे, विजय काळे, गोविंद नरहरे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.