शहरातील भोई गल्ली परिसर कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:14+5:302020-12-31T04:20:14+5:30
माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम या भागात राबविल्यानंतर ४३ जणांना रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजार असल्याचे निदर्शनास आले. रक्तदाबाचे ...

शहरातील भोई गल्ली परिसर कोरोनामुक्त
माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम या भागात राबविल्यानंतर ४३ जणांना रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजार असल्याचे निदर्शनास आले. रक्तदाबाचे २१ तर मधुहाचे १७ आणि इतर आजाराचे ५ अशा ४३ रुग्णांचा यात समावेश होता. या रुग्णांवर मनपाच्या आरोग्य विभागाने विशेष लक्ष देऊन समुपदेशन केले. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे याबाबत परिसरात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा सकारात्मक फायदा झाला असून, रुग्णसंख्या घटत गेली. जून महिन्यात या भागामध्ये ६ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये तब्बल ४९ रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्ये ८ आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. एकूण ६५ रुग्ण या परिसरात आढळले असून, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
१८ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत या भागात ६५ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर यशस्वी उपचार आणि भागातील नागरिकांचे समुपदेशन याबाबत मनपाच्या आरोग्य विभागाने कटाक्ष ठेवला. त्यामुळे हा परिसर कोरोनामुक्त झाला आहे. आरोग्य विभागातील डाॅ. सुरेखा कलशेट्टी, सुलभा जाधव, एएनएम नीता धंदाडे, आशा कार्यकर्ती सोनाली लोखंडे यांनी या भागातील घरांचा सर्वे केला. वेगवेगळे आजार असलेल्या रुग्णांची नोंद केली आणि त्यांना घरी राहण्याचा सल्ला दिला. सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझिंगबाबत मार्गदर्शन केले. केलेल्या सर्वेमध्ये ६० वर्षांपुढील ८२ नागरिक आढळले. त्यांनाही मार्गदर्शन करून घरीच सुरक्षित राहण्यासंदर्भात सूचित केल्याने या भागात सध्या कोरोनाची लाट ओसरली आहे.
१४६ घरसंख्या, १०४९ लोकसंख्या असलेल्या भोई गल्ली परिसरात ऑगस्ट महिन्यात ४९ रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्यात त्यात ८ रुग्णांची वाढ झाली. मात्र या संकटाचा धैर्याने सामना परिसरातील नागरिकांनी केला. मनपाने राबविलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे साथ आटोक्यात आली. सध्या या परिसरात एकही रुग्ण नाही. ही बाब समाधानकारक असून, धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
- विक्रांत गोजमगुंडे, महापौर, लातूर