सावधान, मोबाईल चोरून युपीआयद्वारे खात्यातून २ लाख पळवले
By राजकुमार जोंधळे | Updated: February 1, 2023 19:30 IST2023-02-01T19:29:15+5:302023-02-01T19:30:32+5:30
मोबाईल चोरीनंतर बँकेतील बॅक खाते तपासल्यावर तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे उघडकीस

सावधान, मोबाईल चोरून युपीआयद्वारे खात्यातून २ लाख पळवले
लातूर : फाेन-पे ॲपच्या माध्यमातून एकाला अज्ञातांनी तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याची घटना निलंगा बसस्थानक परिसरात २६ ते २८ जानेवारीदरम्यान घडली. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी देविदास शंकरराव पाटील (वय ७७ रा. तुगाव-हालसी ता. भालकी, जि. बीदर) यांच्या माेबाइलची अज्ञात भामट्याने चाेरी केली. दरम्यान, या माेबाइलचा वापर करत त्यांच्याच माेबाइलमधील फाेन-पे ॲपचा वापर करून फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधून राेख १ लाख ९९ हजार ७५८ रुपये परस्पर काढून घेत गंडा घातला. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात भामट्याविराेधात मंगळवारी गुरनं. ३१/२०२३ कलम ३७९, ४२० भादंविसह कलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस निरीक्षक शेजाळ करत आहेत.
खाते तपासल्यावर उघड झाली घटना...
फिर्यादी देवीदास पाटील यांचा माेबाइल २६ ते २८ जानेवारीदरम्यान अज्ञात चाेरट्यांनी चाेरला. यानंतर त्यांनी याबाबत तक्रारही दाखल केली. त्याचबराेबर बँकेतील बॅक खाते तपासल्यावर तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे समाेर आले. या घटनेने फिर्यादीला घामच फुटला अन् आपल्याला अज्ञाताने गंडविल्याचे समाेर आले.