पावसाळ्यात सापांपासून सावधान...! लातूर जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ चार प्रजाती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:45+5:302021-06-17T04:14:45+5:30
मार्च-एप्रिल हा सापाच्या मिलनाचा काळ असतो. मे महिन्यात साप अंडी घालत असतो. सापाची अंडी उबविण्यासाठी ३० डिग्री अंशी सेल्सिअसपेक्षा ...

पावसाळ्यात सापांपासून सावधान...! लातूर जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ चार प्रजाती!
मार्च-एप्रिल हा सापाच्या मिलनाचा काळ असतो. मे महिन्यात साप अंडी घालत असतो. सापाची अंडी उबविण्यासाठी ३० डिग्री अंशी सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची गरज असते. असे तापमान असलेल्या ठिकाणी साप अंडी देतो. यातून ५५ ते ६० दिवसांत म्हणजेच जून-जुलै महिन्यात पिल्ले निघण्याचा काळ असतो. या महिन्यात पावसामुळे सर्वत्र हिरवळ असते. त्यामुळे या काळात सर्वत्र साप दिसतात. जिल्ह्यात विषारी आणि बिनविषारी असे दोन्ही प्रजातीचे साप आढळून येतात; मात्र नागरिकांना साप दिसल्यास घाबरुन न जाता तत्काळ सर्पमित्राला बोलावावे, असे आवाहनही लातूर शहरातील सर्पमित्रांनी केले आहे.
साप आढळला तर...
शेतात तसेच रस्त्यावर साप आढळून आला तर नागरिेकांनी त्यास इजा न पाेहोचविता जाऊ द्यावे.
घरात साप आढळून आल्यास तर त्याच्यापासून ५ ते ६ फूट अंतर राखून उभे रहावे.
घोणस जातीच्या सापाला डिवचल्यानंतर तो मानवावर हल्ला करू शकताे.
घराच्या परिसरात नाग आढळला तर जेथून तो येण्याची शक्यता वाटते तेथे रॉकेल आणि पाणी शिंपडावे. साप दिसल्यास घाबरुन न जाता तत्काळ सर्पमित्रांना कळवावे.
साप चावला तर...
चार विषारी आणि बिनविषारी साप जिल्ह्यात आढळतात. हे साप चावले तर प्रथमोपचार न करता नजीकच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.
चावलेली जागा घट्ट बांधणेही चुकीचे ठरू शकते, तसेच साप चावल्यानंतर नागरिकांचा भीतीपोटी मृत्यू होतो. त्यामुळे साप चावल्यानंतर भीती न बाळगता रुग्णालय गाठणे सोयीचे ठरते.
सापांची माहिती...
नाग : नाग हा विषारी साप असून, त्याची लांबी ५ ते ६ फूट असते. सदरील साप ३० ते ४० अंडी घालतो. उंदीर हे त्याचे खाद्य असून, शेतात, सहसा हा साप आढळतो. या सापाचा विषारी साप म्हणून ओळख आहे.
घोणस : घोणस हा विषारी साप आहे. एका वेळी ८० ते १०० पिलांना जन्म इेतो. अडगळीच्या जागेत, दगडाच्या ढिगाऱ्याखाली हा साप आढळतो. उंदीर, बेडूक हे प्रमुख खाद्य असून, या सापाला डिवचल्यास तो हल्ला करतो.
मण्यार : मण्यार हा विषारी साप असून, १० ते १२ अंडी घालतो. निशाचर असून, रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. स्वजात भक्षक असून, इतर सापांना खाऊन गुजरान करतो. मनुष्य वस्ती तसेच शेतात हा साप आढळतो.
फुरसे : हा विषारी प्रजातीचा साप असून, एक फूट लांबीचा असतो. ८ ते ९ पिल्लांना जन्म देतो. विंचू या सापाचे प्रमुख खाद्य असून, माळरानावर दगडाखाली हा साप आढळतो. सर्वात लहान विषारी साप अशी या फुरसेची ओळख आहे.
बिनविषारी साप...
तस्कर : तस्कर हा बिनविषारी साप असून, १० ते १२ अंडी घालतो. उंदीर हे प्रमुख खाद्य असून, मानवी वस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळताे. विषारी सापासारखा दिसणारा तस्कर हा बिनविषारी साप आहे.
सर्पमित्र कोट..
पावसाळ्याच्या सुरुवातीला घरात व आसपासच्या परिसरात साप येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा. पावसाळ्यात वातावरणात बदल होत असल्याने निसर्गाच्या अनेक घटकांवर परिणाम होत असतात. जिल्ह्यात ४ प्रकारचे विषारी साप आढळतात. सर्पदंशावर उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे मंत्र, तंत्र, झाडपाला यांचा काहीही उपयोग होत नाही. साप चावल्यास तत्काळ उपचार घेतल्यास कोणताही धोका नाही. साप आढळल्यास त्याला इजा न करता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. - भिमाशंकर गाढवे, सर्पमित्र, लातूर.