बेलकुंडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:19+5:302021-06-05T04:15:19+5:30
मार्चच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. एप्रिलमध्ये गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. दरम्यान, योग्य नियोजन व उपाययोजनांमुळे ...

बेलकुंडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
मार्चच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. एप्रिलमध्ये गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. दरम्यान, योग्य नियोजन व उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात राहिली. गावात कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून ग्राम पंचायतीच्या वतीने जनता कर्फ्यूही लागू करण्यात आला होता.
बेलकुंड येथे मध्यम स्वरूपाची बाजारपेठ असल्यामुळे सरकारी व खासगी दवाखाने, मेडिकल दुकाने, बँक व विविध शासकीय कार्यालये असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या वतीने ॲन्टी कोरोना फोर्सची निर्मिती करण्यात आली. त्याद्वारे गावात येणाऱ्यांची चौकशी करण्यात येऊ लागली. गावातील सर्व व्यापाऱ्यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, ग्राम पंचायतीकडून जनजागृती करण्यात येऊन शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. गावात गर्दी टाळणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे या नियमांचे गावकऱ्यांनी पालन केल्यामुळे गाव आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
गावकऱ्यांचे सहकार्य...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात रुग्णसंख्या वाढली होती. अशावेळी गावकऱ्यांनी शासन नियमांचे पालन करीत सहकार्य केले. गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्ण कमी झाले. यापुढेही नागरिकांनी शासन नियमांचे काटेकारेपणे पालन करावे.
- विष्णू कोळी, सरपंच.