शेतातील रस्त्याच्या वादावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:28+5:302021-07-10T04:14:28+5:30
तू आमच्याकडे का पाहिलस म्हणून मारहाण लातूर : तू आमच्याकडे का बघितलंस या कारणावरून जळकोट तालुक्यातील मेवा येथे चौघांनी ...

शेतातील रस्त्याच्या वादावरून मारहाण
तू आमच्याकडे का पाहिलस म्हणून मारहाण
लातूर : तू आमच्याकडे का बघितलंस या कारणावरून जळकोट तालुक्यातील मेवा येथे चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत दिलीप शंकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास निवृत्ती गायकवाड व अन्य तिघांविरुद्ध जळकोट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यात आली. तसेच हातातील दगडाने कपाळावर उजव्या बाजूस मारून जखमी केले. फिर्यादीची पत्नी, भाऊ, भावजय यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारून मुक्का मार दिला, असे दिलीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार देवीदास निवृत्ती गायकवाड व अन्य तिघांविरुद्ध जळकोट पोलिसात गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पो.हे.काॅ. पवार करीत आहेत.
खिसा कापून ९ हजार लंपास
लातूर : अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी येथील बळीराम शिवराम शेप हे अहमदपूर शहरातील कृषी सेवा केंद्रात गेले असता त्यांच्या पाठीमागच्या खिश्यातील ९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतातील पिकावर तणनाशक औषध घेण्यासाठी फिर्यादी बळीराम शेप गेले होते. त्यांचा अज्ञात चोरट्यांनी खिसा मारून ९ हजार लंपास केले.
शेतातून जाण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : शेतातून जाण्याच्या कारणावरून फिर्यादी व साक्षीदाराला मारहाण केल्याची घटना भाकरवाडी शिवारात घडली. याबाबत पाच जणांविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी उत्तम केरबा पालवे यांना शेतातून जाण्याच्या कारणावरून तसेच मागील भांडणाची कुरापत काढून लाथा-बुक्क्यांनी खुरप्याने व काठीने मारून जखमी केले. परत आमच्या नादाला लागला तर खल्लास करतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात मच्छिंद्र पंढरी पालवे व अन्य चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. राख करीत आहेत.
जमिनीच्या वाटणीवरून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
लातूर : चाकूर तालुक्यातील हाळी येथे मिळालेल्या जमिनीचे पैसे व शेत वाटणीच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साई येथील मिळालेल्या जमिनीचे पैसे व राहिलेल्या शेतीच्या वाटण्या करून द्या, असे म्हटल्याच्या कारणावरून तू कोण वाटणी मागणारा, आता काय वाटण्या करायच्या आहेत, वाटण्या तर पूर्वीच झाल्या आहेत असे म्हणून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी पाठीवर, पोटावर मारून फिर्यादीला मुक्का मार दिला. तसेच दगड घेऊन डोक्यात मारून जखमी केले. तुम्ही परत जर पैसे व वाटणी मागायला आलात तर खत्म करून टाकतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली, असे रोहन दत्तात्रय भोसले यांनी चाकूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार महेश श्रीपती भोसले व अन्य दोघांविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. लांडगे करीत आहेत.
वासनगाव पाटी येथून दुचाकीची चोरी
लातूर : वासनगाव पाटी येथे पार्किंग केलेल्या एमएच २४ ई ७७३० या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अरुण माणिकराव चाटे (रा. तांबवा, ता. केज, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. येणकूर करीत आहेत.
मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरी; २० हजारांचे साहित्य लंपास
लातूर : बसवेश्वर चौकातील एका मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील रोख १२ हजार तसेच फ्रीजमधील कॅटबरी चॉकलेट ७० नग (किंमत ८ हजार) असे एकूण २० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मेडिकलचे दुकान बंद करून फिर्यादी घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून गल्ल्यातील रोख १२ हजार रुपये तसेच फ्रीजमध्ये ठेवलेले कॅटबरी चॉकलेटचे ७० नग (किंमत ८ हजार रुपये) असे एकूण २० हजारांचे साहित्य लंपास केले. याबाबत परमेश्वर काशीनाथराव क्षीरसागर (रा. सिकंदरपूर, ह.मु. विश्वसागर सिटी, कातपूर रोड लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. पवार करीत आहेत.
एक लाख रुपयांची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
लातूर : उदगीर शहरातील मोंढा रोड परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर मोटारसायकलच्या टाकीवर ठेवलेल्या पिशवीतील एक लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. या पिशवीमध्ये बँक पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, चेकबुक असे साहित्य होते, असे नरसिंग नागनाथ पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार उदगीर शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोबाईल शॉपीतून मोबाईलची चोरी
लातूर : वाढवणा पाटी येथे असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील १२ मोबाईलची चोरी केली. याबाबत मनोज व्यंकटराव सुकणे (रा. सुकणी, ता. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वाढवणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खोपेगाव शिवारातून दुचाकीची चोरी
लातूर : औसा ते लातूर जाणाऱ्या रोडवर खोपेगाव शिवारात पार्किंग केलेल्या एमएच ४४ एफ १५४८ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत महेश अंबादास मोकाशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. येणकुरे करीत आहेत.