हातउसने घेतलेल्या पैशांवरून मारहाण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST2021-05-21T04:21:08+5:302021-05-21T04:21:08+5:30
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथील एकास हातउसने घेतलेले ५०० रुपये का देत नाहीस, असे म्हणत ...

हातउसने घेतलेल्या पैशांवरून मारहाण, एकाचा मृत्यू
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथील एकास हातउसने घेतलेले ५०० रुपये का देत नाहीस, असे म्हणत डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सोलापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याअंतर्गतच्या चौकीत गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योतिराम लालू पवार (३०, रा. वांजरवाडा, ता. निलंगा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथील ज्योतिराम पवार याने गावातील काशीराम हणमंत जाधव याच्याकडून ५०० रुपये हातउसने घेतले होते. उसने घेतलेले हे पैसे का देत नाहीस म्हणून जाधव याने त्याच्या डोक्यात काठीने मारले. त्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्यास गावकऱ्यांनी मदत म्हणून वर्गणी जमा करून सोलापुरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केेले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत कमळाबाई लालू पवार यांंच्या फिर्यादीवरून आरोपी काशीराम जाधव याच्याविरोधात कलम ३०२, ३०७, ५०४, ५०६ भादंविनुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिरूर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मल्लया स्वामी हे करीत आहेत.