लग्नाच्या शुटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:16+5:302021-07-26T04:19:16+5:30
लातूर : लग्न समारंभ तसेच प्री वेडिंग शूटसाठी ड्रोनला अनेकांची पसंती आहे. मात्र, शुटिंगसाठी ड्रोन वापरण्यास पोलिसांची परवानगी असणे ...

लग्नाच्या शुटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान !
लातूर : लग्न समारंभ तसेच प्री वेडिंग शूटसाठी ड्रोनला अनेकांची पसंती आहे. मात्र, शुटिंगसाठी ड्रोन वापरण्यास पोलिसांची परवानगी असणे बंधनकारक आहे. अन्यथा विनापरवानगी ड्रोन वापरल्यास कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहरासह ग्रामीण भागातही ड्रोनद्वारे फोटो, शुटिंगची क्रेझ वाढत आहे. यापूर्वी केवळ मोठ्या लग्नात ड्रोनचा वापर केला जायचा. मात्र, आता शहरासह ग्रामीण भागातही लग्न तसेच प्री वेडिंग शूटसाठी ड्रोनला मागणी वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे विवाह समारंभावर मर्यादा असल्याने फोटोग्राफर व शुटिंग करणाऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागला आहे.
शहरात विनापरवानगी ड्रोन वापरण्यास बंदी आहे. दरम्यान, प्री वेडिंग तसेच लग्नाच्या शुटिंगसाठी ड्रोनला मागणी होते. त्यामुळे परवानगीनंतरच ड्रोनचा वापर केला जातो. लग्नसराईवर निर्बंध असल्याने फोटोग्राफी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. - सिद्धू संकाये, फोटोग्राफर
ड्रोन उडविण्यासाठी नियम आणि कायदे
१. शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार ड्रोन विक्री आणि उडविण्याबाबत नियम आणि कायदे निश्चित केले आहेत.
२. वेगवेगळ्या श्रेणीमध्ये ड्रोन उडविण्यास परवानगी मिळते.
३. कोणत्याही कार्यक्रमात ड्रोन उडवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाची परवानगी गरजेची आहे.
व्यावसायिक, करमणुकीच्या उद्देशाने २५० ग्रॅमचे २५ किलो ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोन उड्डाणासाठी परवानगी असणे आवश्यक आहे.
पोलीस परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही. त्यासाठी रितसर स्थानिक पोलिसांना अर्ज करावा लागतो.
नॅनो श्रेणीतील ड्रोन वगळता वैध परवाना किंवा परवानगीशिवाय ड्रोन उडविणाऱ्याला दंड होऊ शकतो. नो फ्लाईंग झोन असल्यास ड्रोन उडवता येत नाही.
मर्यादित उंची आणि क्षेत्रामध्ये ड्रोन उडविण्यास परवानगी देता येते. मात्र, ड्रोनद्वारे कोणतीही धोकादायक वस्तू वाहून नेण्यास मनाई आहे.
संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती, कोणत्या कारणासाठी ड्रोन उडविणार, याची माहिती घेतली जाते.
कोणताही लहान ड्रोन १२० मीटर उंचीपेक्षा अधिक आणि कमाल २५ मीटर प्रतिसेकंद वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करण्यास मनाई आहे.
एका शुटिंगसाठी ५० हजारांचा खर्च
ड्रोनद्वारे फोटोशूट किंवा शुटिंग करायचे असल्यास आधी बाहेरगावाहून ड्रोन असणाऱ्याशी संपर्क साधावा लागत होता.
त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जायचे. सद्यस्थितीत प्री वेडिंग शूटला पसंती असल्याचे चित्र आहे.
प्री वेडिंग शूट आणि विवाह फोटो आणि शुटिंगसाठी जवळपास ५० हजारांहून अधिक खर्च येत असल्याचे सांगण्यात आले.