नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:24+5:302021-07-02T04:14:24+5:30
शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर ...

नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस सुरुवात
शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोकरा योजनेअंतर्गत तालुक्यातील १२० शेतकऱ्यांनी बांबू लागवडीत सहभाग नोंदविला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी शिरूर अनंतपाळचे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या शेतात बांबू लागवडीस प्रारंभ करण्यात आला.
शिरूर अनंतपाळ तालुक्यास घरणी नदीचा १२ कि.मी. आणि मांजरा नदीचा १३ कि.मी. असा एकूण २५ कि.मी.चा किनारा आहे. नदीकाठच्या २० गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात बांबू लागवड करण्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. बांबू लागवडीचा प्रारंभ शिरूर अनंतपाळ येथील प्रायोगिक तत्त्वावर शेती करणारे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या एक एकर शेतीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, नागनाथ चलमले, सुधाकर लव्हांडे, मधुकर लव्हांडे, आपचे आनंदा कामगुंडा, ॲड. अनंत लव्हांडे आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील ४८ हेक्टरची निवड...
शिरूर अनंतपाळ तालुक्याला २५ कि.मी.चा नदीकिनारा लाभला आहे. नदीकाठच्या २० गावांतील नदी किनाऱ्यावर उच्च प्रतीच्या दर्जेदार बांबूची लागवड करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने कृती कार्यक्रम आखण्यात आला असून, १२० एकर म्हणजे ४८ हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एकरी लाखाच्या उत्पादनाची हमी...
पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची हमी नाही; परंतु मानवेल आणि बल्कवा या उच्च प्रतिच्या बांबूची लागवड केली, तर एकरी एक लाखापर्यंत उत्पादनाची हमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली पाहिजे, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
बांबूपासून रोटी, कपडा और मकान प्राप्त...
मानवाच्या गरजा असंख्य असल्या तरी तीन मूलभूत गरजा आहेत ज्या बांबू लागवडीतून पूर्ण होतात, तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण संवर्धन आणि संतुलनाचा समतोल बिघडत आहे. म्हणून प्रत्येकाने पोकरा योजनेंतर्गत किमान एक एकर तरी बांबू लागवड करावी, असेही पाशा पटेल म्हणाले.