डासोत्पत्ती वाढल्यानंतर मनपाला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST2021-08-28T04:23:55+5:302021-08-28T04:23:55+5:30
लातूर : शहरात मागील आठवड्यात रिपरिप पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचून डासोउत्पत्ती झाली आहे. यामुळे तापीच्या व ...

डासोत्पत्ती वाढल्यानंतर मनपाला जाग
लातूर : शहरात मागील आठवड्यात रिपरिप पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचून डासोउत्पत्ती झाली आहे. यामुळे तापीच्या व कीटकजन्य आजारांची साथ पसरल्यासारखी स्थिती शहरात आहे. असे असताना मनपाचा स्वच्छता आणि आरोग्य विभाग गाढ झोपेत होता. विविध संघटना आणि माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर मनपा प्रशासन जागे झाले असून ७ दिवसांची धूर फवारणी मोहीम हाती घेतली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण शहरात अबेट व धूर फवारणी मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, एमपीडब्ल्यू, एएनएम, अशा वर्कर्स व मनपाच्या इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. मोहिमेमध्ये एकूण २५६ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मोहिमेदरम्यान कर्मचारी गृहभेटीस येणार आहेत. पाण्याच्या टाक्या, हौद यामध्ये अबेटिंग केले जाणार आहे. अबेट व धूर फवारणी मोहिमेत असलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
शहरात ठिकठिकाणी डासोत्पत्ती वाढले आहेत. हे डासोत्पत्ती ठिकाणे या मोहिमेमध्ये नष्ट केली जाणार आहेत. डासांच्या अळ्या होऊ नयेत म्हणून गप्पी मासे सोडणे याबाबतही समुपदेशन या मोहिमेत केले जाण्याची शक्यता आहे. डासोत्पत्ती आणि कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढल्यानंतरच मनपाला उपाययोजनेसाठी जाग आली आहे, हे मात्र खरे.