लातूरसारखे ऑटिजम सेंटर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:42+5:302021-06-26T04:15:42+5:30
जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ऑटिजम सेंटरचे उद्घाटन जलसंपदामंत्री ...

लातूरसारखे ऑटिजम सेंटर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार
जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ऑटिजम सेंटरचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, समाजकल्याण उपायुक्त दिलीप राठोड, साहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांची उपस्थिती होती.
स्वमग्नता, बहुविकलांगता, अतिचंचलपणा यांसारखे आजार कायमस्वरूपी नसून, त्यांचे वेळीच निदान करून योग्य उपचार केल्यास त्यावर सहज मात करून संबंधित बालक सामान्य जीवन व्यतित करू शकते. याचाच विचार करीत लातूरच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटिजम सेंटर उभारण्याचे ध्येय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
अद्ययावत सेन्सरी पार्क...
जिल्हा समाजकल्याण विभागाने जवळपास एक कोटी रुपये जिल्हा परिषद दिव्यांग निधीतून खर्च करून एका पडक्या शाळेचे नंदनवन केले असून, या प्रकल्पात केरळ राज्यातील त्रिचुरा येथील सेन्सरी पार्कच्या धर्तीवर या आजाराने ग्रस्त बालकांवर उपचारासाठी उपयुक्त असणारा सेन्सरी पार्क उभारला आहे.