चुरशीच्या निवडणुकीमुळे निकालाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:45+5:302021-01-18T04:17:45+5:30
सोमवारी सकाळी १० वाजतापासून येथील तहसील कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात मतमोजणीस प्रारंभ होणार असून, त्यासाठी नऊ टेबलची ...

चुरशीच्या निवडणुकीमुळे निकालाकडे लक्ष
सोमवारी सकाळी १० वाजतापासून येथील तहसील कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात मतमोजणीस प्रारंभ होणार असून, त्यासाठी नऊ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय दोन टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी ३८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. १२ फेरीतून मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थित पार पडावी म्हणून तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी अच्युत पाटील, नायब तहसीलदार हिसामोद्दीन शेख आणि इतर अधिकारी व कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.
मतमोजणीनंतर गावागावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्डचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनीही शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड यांनी केले आहे.
आज ठरणार २०२ सदस्य...
३३ गावातील ५०५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. २१२ जण गावकारभारी म्हणून निवडले जाणार आहेत.
तालुक्यातील बहुतांश गावात चुरशीच्या निवडणुका झाल्याने निकालाकडे लक्ष लागून आहे. यात प्रामुख्याने वलांडी, धनेगाव, कवठाळा, तळेगाव, जवळगा, नागराळ, विळेगाव, देवणी खु., विजयनगर, लासोना, होनाळी, भोपणी, नागराळ, अचवला या गावांचा समावेश आहे. त्यामुळे उत्कंठा वाढली आहे. मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू होते. त्यामुळे ते दावे कितपत खरे ठरणार, हे स्पष्ट होणार आहे.