ग्राहकांनो लक्ष द्या, वीजबिल भरणा केंद्रावर दोन हजारांच्या नोटा बंद
By आशपाक पठाण | Updated: September 27, 2023 18:58 IST2023-09-27T18:57:57+5:302023-09-27T18:58:06+5:30
२७ सप्टेंबरपासून महावितरणने केली अंमलबजावणी

ग्राहकांनो लक्ष द्या, वीजबिल भरणा केंद्रावर दोन हजारांच्या नोटा बंद
लातूर : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत देण्यात आली होती. दरम्यान, महावितरणने बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ पासून महावितरणच्या सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांवर २००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतीय रिझर्व बँकेच्या अधिसूचनेनुसार २००० रुपयांची नोट ३० सप्टेंबर २०२३पासून चलनातून बंद होत आहे. परंतु बँकेच्या सुट्या व अर्ध वार्षिक ताळेबंद सादर करण्यासाठी होणारी गर्दी व अडचणी पाहता महावितरण मुख्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत लेखी आदेश दिले आहेत. २६ सप्टेंबरपर्यंत स्वीकारलेल्या २ हजार मूल्याच्या सर्व नोटा कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा / भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून ५ हजार रुपयांपर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येते. सर्व प्रकारच्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची ऑनलाइन सोय २४ तास उपलब्ध आहे.
ऑनलाइन भरल्यास सव्वा टक्के सूट
ऑनलाइन वीजबिल भरल्याने ग्राहकाला ०.२५ टक्के आणि तत्पर देयक भरणा सवलतपोटी १ टक्का अशी एकूण १.२५ टक्के सूट तत्काळ मिळते. शिवाय विलंब आकार व व्याजातून सुटका होते. गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाइन भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.