लातूर : "विरोधकांकडे आता सांगायला आणि लोकांना द्यायला काहीही नाही. त्यामुळे मत चोरीचा आरोप करून भाजपविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे", अशी टीका माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर केली. भारतीय जनता पक्ष, लातूर ग्रामीणच्या वतीने लातुरात विश्व पॅलेस मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळा व भाजप संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
लातूरकरांनी धक्कातंत्र दिला..."प्रस्थापित नेतृत्व असताना सामान्य कार्यकर्त्याला लोक निवडून कसे देतील? अस वाटत होते. मात्र, आ. रमेश कराड यांना विश्वास होता. लातूरकर धक्कातंत्र दिल्याशिवाय राहणार नाहीत. संघर्षाततून निवडून आलेल्या नेतृत्वाला सामान्यांची जाण असते," असेही खा. चव्हाण म्हणाले.
विकसित मराठवाड्याचा संकल्प..."मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शत-प्रतिशत भाजप करण्याचे शिवधनुष्य उचलले असून, लातुरात ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १०० टक्के होईल. विकसित महाराष्ट्राच्या धर्तीवर आता आम्हाला विकसित मराठवाडा असा संकल्प करायचा आहे. आगामी पाच वर्षांत मराठवाड्याचे चित्र बदलेल. यासाठी एकजुटीने काम कारा. त्यासाठी आता जिल्ह्यात भाजपची सत्ता महत्त्वाची आहे", असेही चव्हाण म्हणाले.
१४ वर्षांच्या वनवासानंतर घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय..."मी १४ वर्षांचा वनवास भोगला आहे. राजकारणातून मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जनता माझ्यासोबत होती म्हणून मी आज आहे. शिवाय, पाठीशी शंकरराव चव्हाण आणि शिवराज पाटील चाकूरकर यांची पुण्याई होतीच. १४ वर्षांनंतर निर्णय घेतला आणि भाजपात प्रवेश केला. आज एकदिलाने आम्ही काम करत आहोत", असेही ते यावेळी म्हणाले.