एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 15:08 IST2020-11-20T15:07:59+5:302020-11-20T15:08:18+5:30
आरोपीस लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्यास अटक
लातूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीस लातूरच्या सायबर व गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उल्हासनगर (जि. ठाणे) येथून एकास बुधवारी रात्री अटक केली आहे.
आरोपीने गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, अकोला, यवतमाळ, वर्धा, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे येथे आरोपी फिरला आहे. एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधी चौक तसेच अहमदपूर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस ठाणे तसेच गांधी चौक पोलिसांनी तपास केला असता गणेश भालचंद्र लोडते ऊर्फ फौजी (२५, रा. संत ज्ञानेश्वरनगर, खेमाणी, उल्हासनगर-२, जि. ठाणे) याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता गांधी चौक पोलीस ठाणे व अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीतील एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांच्या बँक अकाऊंटमधून रोख रक्कम काढून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, आरोपीस गांधी चौक पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.