विरोधात प्रचाराला आलेले अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, 'चाकूरकर अच्छे आदमी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:57 IST2025-12-13T18:57:09+5:302025-12-13T18:57:27+5:30
दीर्घकाळ सत्तास्थानी असताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार असो की, विरोधी पक्ष यांच्या धोरणांवर भाष्य केले. व्यक्तिगत टीका केली नाही.

विरोधात प्रचाराला आलेले अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, 'चाकूरकर अच्छे आदमी'
लातूर : सातवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत विराेधकांनाही जिंकले. काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढताना त्यावेळचे भाजपाचे उमेदवार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. परंतु, काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांचा त्यांनी अच्छे आदमी असा उल्लेख केला. दुसऱ्या दिवशी माध्यमांमधून त्याचीच बातमी झाली. स्वत: चाकूरकर यांनीही कोणत्याही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारावर व्यक्तिगत टीका केली नाही.
विरोधकांचा आदरपूर्वक उल्लेख...
दीर्घकाळ सत्तास्थानी असताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार असो की, विरोधी पक्ष यांच्या धोरणांवर भाष्य केले. व्यक्तिगत टीका केली नाही किंबहुना अनेक भाषणांमध्ये समोरच्या उमेदवारांचे नाव आदरपूर्वक ते घ्यायचे.
इस बेटी ने मुझे हराया...
सलग सात वेळा लोकसभेवर निवडून गेलेले चाकूरकर २००४च्या निवडणुकीत पराभूत झाले. भाजपाकडून उभ्या असलेल्या रुपाताई पाटील निलंगेकर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग सरकार सत्तेत आले आणि पराभूत झाल्यानंतरही चाकूरकर यांनी केंद्रात गृहमंत्रिपदाची शपथ घेतली. ते राज्यसभेवर निवडले गेले. दरम्यान, संसदेत लातूरचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रुपाताई पाटील निलंगेकर जेव्हा समोर आल्या तेव्हा त्यांनी स्वत:हून अभिनंदन केले. इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ओळख करून दिली. लातूर से मुझे इस बेटी ने हराया, असे स्मित हास्य करत ते म्हणाले. राजकारणातील पद, प्रतिष्ठा, सत्ता यापलिकडे विचार आणि धोरण असे राजकारण करणारे नेतृत्व शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.