कोविड सेंटरला नातलगाचे नाव का सांगितले म्हणून आशा सेविकेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 18:04 IST2020-07-18T17:33:21+5:302020-07-18T18:04:27+5:30
देवणी तालुक्यातील विळेगावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़ दरम्यान, आशा स्वयंसेविकांकडून प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत़

कोविड सेंटरला नातलगाचे नाव का सांगितले म्हणून आशा सेविकेस मारहाण
देवणी (जि. लातूर) : आमच्या नातलगाचे नाव कोविड सेंटरला का दिले, असे म्हणत आठ जण गैरकायद्याने एकत्र येऊन आशा स्वयंसेविकेस अर्वाच्च भाषेत बोलत मारहाण केल्याची घटना देवणी तालुक्यातील विळेगाव येथे घडली़ याप्रकरणी देवणी पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.
देवणी तालुक्यातील विळेगावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़ दरम्यान, आशा स्वयंसेविकांकडून प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ तेव्हा गावातील ८ जण गैरकायद्याने एकत्र आले आणि आशा स्वयंसेविका शोभा टेकाळे यांना ‘तू आमच्या नातलगाचे नाव कोविड सेंटरला का दिले’ असे म्हणत अर्वाच्च भाषेत बोलत मारहाण केली़ याप्रकरणी आशा स्वयंसेविका शोभा टेकाळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी मनीषा सुरेश खुदमपुरे, सुरेश व्यंकट खुदमपुरे, विठ्ठल सुरेश खुदमपुरे, गणेश सुरेश खुदमपुरे, सखुबाई व्यंकट खुदमपुरे व इतर तिघांविरुध्द देवणी पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणणे व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि़ रणजित काथवटे करीत आहेत़
आशा स्वयंसेविकांना त्रास...
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील व्यक्तींची दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे. गावोगावी दररोज सर्वे करून आरोग्य तपासणीचे काम आशा स्वयंसेविकांकडून करवून घेतले जात आहे. गावातील एखादी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठांना दिल्यास त्याचा त्रास गावस्तरावर आशा स्वयंसेविकांना सहन करावा लागत आहे. देवणी तालुक्यात यापूर्वीही असा प्रकार घडला होता.