उदगीर (जि. लातूर) : सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेला तिघा अज्ञातांनी फसविल्याची घटना उदगीर शहरात नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात असलेल्या सहयोग बँकेसमोर दुपारी ३ वाजता घडली. याबाबत उदगीर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, शिरोळ-जानापूर (ता. उदगीर) येथील शांताबाई गंगाधर मंदे (वय ७८) या महिलेला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तिघा अज्ञातांनी संगनमत करून उदगीर नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात असलेल्या सहयोग बँकेसमोर सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून बनावट सोन्याचे बिस्कीट दिले. वृद्ध महिलेकडील आठ ग्रॅम सोने आणि ३०० रुपये रोख असा एकूण ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे वृद्ध महिलेच्या लक्षात आले. उदगीर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाती दिले बनावट बिस्कीट...सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून फिर्यादी महिलेकडील आठ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. त्याबदल्यात बनावट असलेले सोन्याचे बिस्कीट हाती दिले. काही क्षणात तिघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सोन्याचे बिस्कीट बनावट असल्याचे आणि फसवणूक झाल्याचे वृद्ध महिलेच्या लक्षात आले. वृद्धांना फसवणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे.