देवर्जन- हत्तीबेट मार्गावरील सर्व बस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:16 IST2021-01-15T04:16:54+5:302021-01-15T04:16:54+5:30

देवर्जन-हत्तीबेट मार्गावरून उदगीर बस आगाराच्या लातूर, करवंदी, गंगापूर, साकोळ, वलांडी या गावांना जाणाऱ्या दिवसातून १६ बस फेऱ्या नियमित ...

All buses on Devarjan-Hattibet route closed | देवर्जन- हत्तीबेट मार्गावरील सर्व बस बंद

देवर्जन- हत्तीबेट मार्गावरील सर्व बस बंद

देवर्जन-हत्तीबेट मार्गावरून उदगीर बस आगाराच्या लातूर, करवंदी, गंगापूर, साकोळ, वलांडी या गावांना जाणाऱ्या दिवसातून १६ बस फेऱ्या नियमित सुरू होत्या. कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे बंद असल्याने राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व बस आगारातील चालक-वाहक व बस पाठवून मुंबईतील प्रवाशांची सोय केली आहे. ही सोय करताना ग्रामीण भागातील प्रवासी जनतेची गैरसोय होणार नाही, याची दक्षता स्थानिक आगारप्रमुखांनी घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत. मात्र, चालक-वाहक व बस नसल्याचे कारण पुढे करून या बस आगाराने देवर्जन- हत्तीबेट मार्गावर धावणाऱ्या सर्व बस बंद केल्या आहेत.

देवर्जन-हत्तीबेट मार्गावर हत्तीबेट हे ‘ब’ वर्गीय पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळास रोज ६०० ते ७०० पर्यटक-भाविक भेट देतात. शिवाय, हा मार्ग देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा तालुक्यांसह लातूर जिल्ह्याला जोडलेला आहे. असे असताना या मार्गावरून धावणाऱ्या सर्व बस या आगाराने बंद केल्या आहेत. या १६ फेऱ्यांपैकी दुपारी १.३० वा. साकोळ व ५ वा. वलांडी या दोन फेऱ्या कधीतरी जात आहेत. ५ वा. वलांडी ही फेरी हत्तीबेट-देवर्जनमार्गे जाते. मात्र, ती परत येताना या मार्गाने न येता तळेगाव, दावनगावमार्गे उदगीरला पोहोचते. ही बस हत्तीबेटमार्गेच परत यावी, अशी मागणी प्रवाशांतून सातत्याने आगाराच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे केली आहे. या मार्गावरील सर्व बंद करण्यात आलेल्या बस तत्काळ सुरू करण्याची मागणी या भागातील गावकऱ्यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांकडे दुर्लक्ष...

ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय करून मुंबईच्या प्रवाशांची सोय केली जात आहे. मुंबईच्या प्रवाशांकडे दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. शिवाय, लोकल रेल्वे बंद असली तरी टॅक्सी व अन्य साधने मुंबईच्या लोकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची होत असलेली गैरसोय तत्काळ थांबवावी, अशी मागणी देवर्जनचे माजी जि. प. सदस्य चंद्रप्रकाश खटके व सरपंच सुनीता खटके यांनी केली आहे.

Web Title: All buses on Devarjan-Hattibet route closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.