वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

By संदीप शिंदे | Published: March 1, 2024 06:52 PM2024-03-01T18:52:17+5:302024-03-01T18:55:23+5:30

गावातीलच केंद्रावर बोर्ड, शिक्षण विभागाने केली परीक्षेची सोय 

After performing father's funeral, the son gave his 10th class paper, the board arranged the examination in the village itself | वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

लातूर : दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या आदल्या रात्री हे कठीणच. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश रामनाथ पुरी याने आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रुनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. दरम्यान, परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात असल्याने बोर्ड, शिक्षण विभागाने गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय केली होती.

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश पुरी हा लातूर तालुक्यातील बोरी-सलगरा बु. येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत असून, राजीव गांधी विद्यालयात शिकतो. दहावी परीक्षेसाठी बोरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात त्याचा बैठक क्रमांक आला होता. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्याचे वडील रामनाथ पुरी यांचे काम करताना अपघाती निधन झाले. ही वार्ता समजताच ऋषिकेशला मामासह ढाळेगावला जावे लागले. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता अंत्यविधी त्यात परीक्षा केंद्र मूळगावापासून १०० किलोमीटरवर असल्याने पेपर देता येणार नाही असाच समज होता. त्यात वडिलांच्या निधनामुळे ऋषिकेशही पेपर देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता. मात्र, नातेवाइकांनी ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग आणि गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी ऋषिकेशच्या घरी जाऊन सांत्वन करीत त्यास सर्व प्रकारची परवानगी मिळवून देत गावातीलच परीक्षा केंद्रावर त्याची परीक्षा देण्याची सोय केली. ऋषिकेशच्या कुटुंबात आई, छोटा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन दिली परीक्षा...
रामनाथ पुरी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाल्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. ऋषिकेश परीक्षा देण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मात्र, लातूर विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली, सांत्वन केले. परीक्षा देण्यास त्याला तयार केले. सर्व प्रकारची परवानगी देत ढाळेगावातील माध्यमिक आश्रमशाळा या केंद्रावर परीक्षेची सोय केली. परीक्षेला जाताना वडिलांचे अंत्यदर्शन घेतले आणि तो परीक्षेला निघाला. यावेळी नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

Web Title: After performing father's funeral, the son gave his 10th class paper, the board arranged the examination in the village itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.