आठ वर्षांनी किल्लारी साखर कारखाना कर्जमुक्त, अवसायक मंडळाकडे ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:37+5:302021-05-06T04:20:37+5:30
किल्लारी : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा अशी सातत्याने शेतकऱ्यांतून मागणी होत होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा ...

आठ वर्षांनी किल्लारी साखर कारखाना कर्जमुक्त, अवसायक मंडळाकडे ताबा
किल्लारी : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा अशी सातत्याने शेतकऱ्यांतून मागणी होत होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नांदेडने एक कोटी १५ लाख रुपये भरून हा कारखाना कर्जमुक्त करून तो अवसायक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा कर्जामुळे बंद होता. तो सुरू करण्यात यावा अशी सातत्याने ऊस उत्पादकांतून मागणी होत होती. त्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अमित देशमुख, खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री बस्वराज पाटील, आ. बाबासाहेब पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, सुरेश दाजी बिराजदार यांनी प्रयत्न केले होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते.
किल्लारी कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची दोन कोटी ४० लाखांची थकबाकी होती. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर कारखान्यावर अवसायक मंडळ स्थापन झाले होते. या मंडळाने पक्षश्रेष्ठींना भेटून एक कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज माफ करून घेतले होते. उर्वरित एक कोटी १५ लाख रुपये थकीत राहिले होते.
अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नांदेडने एक कोटी १५ लाख रुपये भरून हा कारखाना कर्जमुक्त करून तो अवसायक मंडळ आणि जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्याकडे ताबा दिला आहे. त्यामुळे कारखाना सुरू होण्यास गती मिळाली आहे. सोमवारी कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे नांदेडचे प्राधिकृत अधिकारी विवेकानंद देशमुख यांनी अधिकृतपणे कारखाना ताब्यात दिल्याचे लेखी दिले आहे. यावेळी अवसायक मंडळाचे विजयकुमार सोनवणे, केशव ऊर्फ बाबा पाटील यांनी ताबा घेतला. यावेळी रमेश मेश हेळंबे, विनोद बाबळसुरे, विकास हराळकर, शिवाजी कदम, वामन पाटील, संजय पवार तसेच नानाराव भोसले, बंकट पाटील, रुक्मानंद पवार, दत्ता भोसले, प्रकाश पाटील, कारखान्याचे एमडी टी. एन. पवार, सुरक्षा अधिकारी शिवाजी मोरे उपस्थित होते.
पुढील वर्षी कारखाना सुरू होणार...
किल्लारी कारखाना कर्जमुक्त करण्यात आल्याने तो सुरू होण्यासाठी गती मिळाली आहे. यंदा कारखान्यातील मशिनरींची दुरुस्ती करून घेण्यात येईल. पुढील हंगामात कारखाना सुरू होणार असल्याचे अवसायक मंडळाचे विजयकुमार सोनवणे, केशव ऊर्फ बाबा पाटील यांनी सांगितले.
यापुढेही मदत...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी विवेकानंद देशमुख म्हणाले, हा कारखाना सुरू करण्यासाठी पुढेही मदत व सहकार्य केले जाईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील.