लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त
By हणमंत गायकवाड | Updated: September 1, 2022 17:16 IST2022-09-01T17:15:20+5:302022-09-01T17:16:02+5:30
२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे.

लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त
लातूर : जिल्ह्यातील उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा या नगर परिषदा आणि शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, जळकोट या नगरपंचायतींमध्ये वेंगुर्ला पॅटर्नप्रमाणे कचरा विघटन केले जात आहे. १७ सप्टेंबरपर्यंत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कचरामुक्त होणार आहेत.
नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन विघटन प्रक्रिया कशी करावी, या संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. वेंगुर्लाच्या धरतीवर कचरा विघटन प्रक्रिया या स्थानिक स्वराज्य संस्थात केली जात आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आग्रहातून सर्व नियोजन करण्यात आले असून, सहआयुक्त रामदास कोकरे यांचे सहकार्य त्याला मिळत आहे. या उपक्रमाला नगरपरिषद व नगरपंचायती अंतर्गत असलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
काय आहे वेंगुर्ला पॅटर्न?
२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे. देशभरात त्यांचे नाव झाले आहे. अनेकांनी त्यावर रिसर्च पेपर केले आहेत. कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वेंगुर्ला नगर परिषदेला मिळाली असून, याच धर्तीवर लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कचऱ्याचे विघटन केले जात आहे.