शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST2021-02-12T04:18:40+5:302021-02-12T04:18:40+5:30
मतिमंद विद्यालय कर्मचाऱ्यांचे उपोषण लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील राजीव गांधी निवासी मतिमंद विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने ...

शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने उपक्रम
मतिमंद विद्यालय कर्मचाऱ्यांचे उपोषण
लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील राजीव गांधी निवासी मतिमंद विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात येत आहे. निवेदनावर व्ही.एच. जानते, एस.एस. जाधव, एफ.ए. शेख, व्ही.एल. टेळे, एस.बी. लामतुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. वेतन करण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
खरोसा येथे धम्मपद महोत्सवाचे आयोजन
लातूर : माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औसा तालुक्यातील खरोसा येथे बुद्ध लेणी परिसरात १३ फेब्रुवारी सकाळी ९.३० वाजेपासून धम्मपद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पू. भन्ते डॉ. उपगुप्त महाथेरो, भन्ते पय्यानंद, भन्ते धम्मसार, भन्ते सुमेधजी नागसेन यांची धम्मदेसना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जि.प., पं.स. रिक्त जागांसाठी यादी कार्यक्रम
लातूर : लातूर, चाकूर, अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या तर औसा तालुक्यातील पंचायत समिती गणाच्या रिक्त जागांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. एकुरगा गटासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, लातूर व प्राधिकृत अधिकारी तहसीलदार यांची चापोली गटासाठी नियंत्रण अधिकारी, हडोळती गटासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
वाहन चालक सेवा निविदा रद्द करावी
लातूर : वाहन चालक सेवा पुरवठा निविदा रद्द करण्याची मागणी श्री संत भगवान सुशिक्षित बेरोजगार, स्वयंरोजगार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास देण्यात आले आहे. सदरील निविदा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने काढण्यात आली होती, असे स्वयंरोजगार संस्थेचे अध्यक्ष आर.एस. मुंडे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक
लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा केलेल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी विलास कुमरवार, गिरीश दाभाडकर, अलाउद्दीन काझी, दयानंद एरंडे, विकास भोईर, दिगंबर सोनटक्के, शशिकांत ठाकरे, माऊली कांबळे, महेताब शेख यांची उपस्थिती होती.
नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकऱ्यांची गैरसोय
लातूर : जिल्ह्यात सध्या रबी हंगामातील पिकांना पाणी देण्याची कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्त होत आहेत. तात्काळ रोहित्राची दुरुस्ती होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. महावितरणने नादुरुस्त असलेले रोहित्र तात्काळ दुरूस्त करून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्ह्यात यंदा सर्वाधिक हरभऱ्याचा पेरा झाला असून, सध्याला शेत-शिवारात पिके बहरली आहेत. मात्र रोहित्राच्या समस्येमुळे गैरसोय होत आहे.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात व्याख्यान
लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात तत्वज्ञान विभाग व तत्वज्ञान संशोधन केंद्राच्या वतीने डॉ. सुरेंद्र गायधने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. शीतल येरुळे, प्रा. रत्नाकर केंद्रे, प्रा. सोनू स्वामी यांची उपस्थिती होती. तत्वज्ञान हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून, त्यांनी मानवी जीवन पूर्णपणे व्यापले आहे, असे मत डॉ. गायधने यांनी व्यक्त केले आहे.
एसटीच्या मालवाहतूक सेवेला प्रतिसाद
लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाच्या वतीने मालवाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत जवळपास ९४ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले आहेत. लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, निलंगा या पाच आगारांसाठी विशेष मालवाहतूक ट्रकचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही मालवाहतूक केली जात असल्याचे लातूर महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
महारेशीम अभियानात सहभाग नोंदवावा
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढावा, यासाठी महारेशीम अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. जिल्हा रेशीम विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आले असून, गावोगावी रेशीम लागवडीबद्दल माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या ५०३ शेतकऱ्यांनी ५६८ एकरवर तुतीची लागवड केली असल्याचे जिल्हा रेशीम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव करावेत
लातूर : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन ही योजना राबविली जाणार आहे. त्याअंतर्गत २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांत एक उत्पादन पिकास मंजुरी देण्यात आली आहे. या उद्योगासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे लागणार असून, अधिक माहितीसाठी कृषी विभागातील एम.एम. निटुरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.
जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी
लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता आबाधीत राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत १५ फेब्रुवारीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह आदींना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक खर्च मुदतीपूर्वी सादर करावा
लातूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यासाठी नामनिर्देशन भरल्यापासून ते निकाल लागेपर्यंत केलेल्या खर्चाचा तपशील देणे बंधनकारक आहे. निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत तालुकास्तरावर प्राधिकृत खर्च पथकास सादर करणे आवश्यक असून, नियमांचे पालन करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.