झाडांना खिळे ठोकाल तर कारवाई होणार; लातूरात खिळेमुक्त झाडांचा संकल्प
By हणमंत गायकवाड | Updated: October 17, 2023 15:41 IST2023-10-17T15:40:55+5:302023-10-17T15:41:07+5:30
'वसुंधरा' प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

झाडांना खिळे ठोकाल तर कारवाई होणार; लातूरात खिळेमुक्त झाडांचा संकल्प
लातूर : आपल्या व्यवसायाच्या जाहिराती झाडांवर लावण्यासाठी झाडांना मोठमोठे खिळे ठोकले जातात. यामुळे झाडांना इजा होते. याबाबत वसुंधरा प्रतिष्ठानने लातूर मनपाकडे निवेदन देऊन खिळे मारणाऱ्या जाहिरातदार यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन मनपा उपायुक्त यांनी प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था २०१६ पासून लातूर जिल्ह्यात 'खिळेमुक्त झाड' अभियान राबवून झाडांना वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न करते.
झाडांना खिळे मारल्याने झाडांची वाढ खुंटते, शिवाय त्यांना इजा होतात. झाडांना खिळे ठोकणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सोमवारी वसुंधरा प्रतिष्ठानने मनपा आयुक्त यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन उपायुक्तांनी स्वीकारले. यावेळी अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, डॉ. अजित चिखलीकर, प्रिया मस्के, सुनैना नायब, श्रद्धा मोरे, बालिका कुलकर्णी, हरिदास निलामे, अनिकेत चव्हाण, चैतन्य बनसोडे, आदींचा समावेश होता. कठोर कारवाई करून आपल्या जाहिराती लावण्यासाठी खिळे मारणाऱ्या आस्थापनावर कारवाई होणे आवश्यक आहे. कारवाई करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड मनपाने घेतला आहे. लवकरच लातूर मनपादेखील कारवाई करणार आहे.
झाडांना कलर मारणेही घातक
झाडांवर विद्युत रोषणाई सोडणे, झाडांना खिळे मारणे, झाडांवर आपल्या व्यवसायाचे साहित्य ठेवणे, झाडांना घातक कलर मारणे, आदी प्रकार लातूर शहरात वाढले आहेत. हा प्रकार थांबणे आवश्यक असून, मनपा त्या दृष्टीने पावले उचलणार आहे. झाडे माणसाला जगण्यासाठी मोफत ऑक्सिजन देतात. झाडे आहेत म्हणून आपण आहोत, याचा विसर माणसाला पडतो.