विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:22+5:302021-05-13T04:19:22+5:30
बांधकाम मजुरांना मदतीची प्रतीक्षा लातूर : राज्य शासनाच्या वतीने बांधकाम मजुरांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली ...

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
बांधकाम मजुरांना मदतीची प्रतीक्षा
लातूर : राज्य शासनाच्या वतीने बांधकाम मजुरांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास १ लाख ५५ हजार मजुरांची संख्या आहे. त्यापैकी १ लाख २१ हजार जणांची अधिकृत नोंदणी आहे. टप्प्याटप्प्याने मदत प्राप्त होत असून, अनेक मजुरांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने बांधकाम मजुरांच्या खात्यावर तात्काळ मदत वर्ग करावी, अशी मागणी होत आहे.
रोहयोच्या कामांना मागणी वाढली
लातूर : जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, रबी हंगामाची कामेही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने रोहयोच्या कामांना मागणी वाढली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जवळपास पावणेतीन लाख कुटुंबातील सहा लाख मजुरांची रोहयो विभागाकडे नोंदणी आहे. मागणीनुसार तात्काळ कामे पुरवावीत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोनामुळे अनेकांचे स्थलांतर झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहयोमुळे त्यांना आधार मिळाला आहे.
फळबाग लागवडीसाठी विशेष मोहीम
लातूर : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवडीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातूनही योजनांची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरी असते. त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण व्हावे, यासाठी फळबाग लागवडीसाठी जनजागृती केली जात आहे. द्राक्ष, मोसंबी, आंबा आदी फळबागांसाठी शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे.
खाडगाव रोड परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील खाडगाव रोड परिसरात गटारीच्या नाल्या तुंबल्या आहेत. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा टाकला जात असल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दरम्यान, यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असून, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन खाडगाव रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
रेणापूर नाका परिसरात नियोजन कोलमडले
लातूर : रेणापूर नाका परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. परिणामी, रस्त्याच्या कडेला मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हा कचरा वाऱ्याने रस्त्यावर उडत आहे. परिणामी, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या भागात नियमित घंटागाडी सुरू करावी, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. नियमित घंटागाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय
लातूर : शहरातील पाण्याची टाकी ते पाच नंबर चौकाकडे येणाऱ्या रेल्वेलाइन समांतर रस्त्यावर काही ठिकाणी पाइपलाइनसाठी खोदकाम करून ठेवले आहे. परिणामी, व्यवस्थित दबई न केल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. डांबरीकरणही अर्धवट करण्यात आले असून, याकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.