शेतकऱ्यांना कर्ज वाटपास टाळाटाळ केल्यास बँकांवर कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:54+5:302021-07-17T04:16:54+5:30

येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश ...

Action against banks for non-distribution of loans to farmers | शेतकऱ्यांना कर्ज वाटपास टाळाटाळ केल्यास बँकांवर कार्यवाही

शेतकऱ्यांना कर्ज वाटपास टाळाटाळ केल्यास बँकांवर कार्यवाही

येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आदी उपस्थित होते.

यावेळी खा. ओमराजे निंबाळकर म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासंदर्भात बँकांनी सरळ व सोप्या मार्गांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पीक कर्ज वाटप करावे. जिरायत व बागायत क्षेत्रासाठी किती प्रमाणात कर्ज वाटप करता येते याचे फलक सर्व बँकांनी शाखेत दर्शनी भागात लावावेत. तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वाटपाची टक्केवारी अतिशय निराशाजनक असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटप चांगले केले असल्याचे कौतुक केले.

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासंदर्भात रिझर्व्ह व लीड बँकेकडून आदेश दिले असतानाही राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांची हेळसांड करतात. ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज वाटपाचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने खरीप हंगामासाठी प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. बँकांनी त्वरित कर्जवाटप करावे. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असतील तर आमच्याशी गाठ आहे, असा दमही त्यांनी दिला.

बँक अधिकाऱ्यांना धरले धारेवर...

यावेळी शेतकऱ्यांना कर्ज वाटपास व बचत गटाचे खाते काढण्यास बँका टाळाटाळ करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली, तेव्हा खा. ओमराजे निंबाळकर यांनी संबंधित शाखा अधिकाऱ्यांना धारेवर धरले. असा प्रकार पुढे घडल्यास संबंधित बँकेवर कार्यवाही करण्यात येईल. बैठकीत विविध गावचे सरपंच व कार्यकर्त्यांनी रस्ते, शिवरस्त्याबाबतच्या अडचणी मांडल्या. तेव्हा विकास कामासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रस्ताव दाखल करा, मी तात्काळ निधी देतो, असेही खा. ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Web Title: Action against banks for non-distribution of loans to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.