विनाकारण फिरणाऱ्या १०२ वाहनांवर कारवाई, ३७ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:37+5:302021-05-23T04:18:37+5:30
अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व पोलीस ठाणे परिसरात वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच काहीजण विनाकारण ...

विनाकारण फिरणाऱ्या १०२ वाहनांवर कारवाई, ३७ हजारांचा दंड वसूल
अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व पोलीस ठाणे परिसरात वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच काहीजण विनाकारण दुचाकी व चारचाकीवरही फिरत असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात येताच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले हे स्वतः रस्त्यावर येऊन कारवाई केली. ७९ दुचाकी, २० कार, तीन ऑटो अशा १०२ वाहनांवर कारवाई करून ३७ हजारांच्या वर दंड वसूल केला.
ही कारवाई नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. तसेच मोटारवाहन कायद्यांतर्गत १२ वाहनांवर कारवाई करून ६ हजार ३०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. सकाळच्या सत्रात विकेंड लॉकडाऊन असतानाही काही दुकाने सुुरु असल्याचे पाहून ७ अस्थापनांवर कारवाई करीत ७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कमी झाली. कारवाई वेळी पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पाटील, नागोराव कुंभार, एकनाथ डंख, पोलीस हवालदार सुहास बेंबडे, कैलास चौधरी, भगवान गिरी, धर्मपाल गुट्टे, शिवा चोले, रत्नदीप कांबळे, राम गोमारे, रामेश्वर फड तसेच होमगार्ड व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
विकेंड लॉकडाऊनचे पालन करा...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. घरीच राहावे. विनाकारण रस्त्यावर येऊ नये. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले यांनी सांगितले.
नागरिकांच्या कारणांनी पोलीस ही चक्रावले...
पोलिसांनी कारवाई सुरू करताच नागरिकांनी विविध कारणे सांगण्यास सुरुवात केली. जास्तीत जास्त नागरिकांनी औषधी, दवाखान्यात जाण्यासाठी तर अनेकांनी पेट्रोलसाठी, पाहुण्यांना भेटण्यासाठी, बाहेरगावी जाण्यासाठी, दूध पुरविण्यासाठी, ट्रॅक्टरचे साहित्य आणण्यासाठी, शेताकडे जाण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले. तसेच काहींनी बाहेर कोण आहे का, कारवाई कशी केली जात आहे, हे पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. हे ऐकून पोलीस ही चक्रावून गेले आहेत.