सेवा ज्येष्ठतेनुसार महानगरपालिकेतील १३ कर्मचारी झाले अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:33+5:302021-07-08T04:14:33+5:30
लातूर : अनेक वर्षानंतर लातूर महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार १३ कर्मचाऱ्यांना ...

सेवा ज्येष्ठतेनुसार महानगरपालिकेतील १३ कर्मचारी झाले अधिकारी
लातूर : अनेक वर्षानंतर लातूर महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार १३ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. न्यायालयात असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेतील अनेक पदे रिक्त आहेत, पदोन्नतीने ही पदे भरण्यासंदर्भात महापौर विक्रांत गोजमगुंडे हे मागील काही काळापासून प्रयत्नशील होते. त्यावरून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊन त्या जागांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी पदोन्नती समितीची बैठक महानगरपालिकेच्या कार्यालयात नुकतीच झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागासवर्ग पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
लिपिक या संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. व्ही. एस. बिडवई यांना महिला व बालविकास अधिकारी यांचे पथकात, जी. आर. मठपती यांना विधी अधिकारी यांचे पथकात, एस. बी. शेवाळकर यांना प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकात तर पी. एस. खेकडे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकात नियुक्ती देण्यात आली आहेत. तीन कर्मचाऱ्यांना मुख्य स्वच्छता निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. संजय कुलकर्णी, शेख कलीम व किशोर पवार या तिघांनाही मुख्य स्वच्छता अधिकाऱ्यांच्या पथकात नेमणूक देण्यात आली आहे. एन. बी. तापडे, शेख खदीर, व्ही. एस. राजुरे यांना अधीक्षक म्हणून पदोन्नती देत मनपा मुख्यालयात पदस्थापना देण्यात आली आहे. उषा काकडे यांना शाखा अभियंता स्थापत्य या पदावर पदोन्नती देण्यात आली असून, शहर अभियंता स्थापत्य यांच्या पथकात पदस्थापना देण्यात आली आहे. शेख जाफर शब्बीर यांना अग्निशमन प्रणेता म्हणून पदोन्नती देत महापालिकेच्या अग्निशमन विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. जे. एम. ताकपिरे यांना कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणून पदोन्नती मिळाली आहे. मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून, संबंधित अधिकाऱ्यांना आपापल्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.