खदानीच्या पाण्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू
By हरी मोकाशे | Updated: August 1, 2023 19:38 IST2023-08-01T19:37:57+5:302023-08-01T19:38:20+5:30
उदगीर शहराजवळील सोमनाथपूर भागातील घटना

खदानीच्या पाण्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू
उदगीर (जि. लातूर) : खदानीत पोहण्यासाठी गेलेला मित्र बुडत असल्याचे पाहून दुसऱ्या मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास शहराजवळील सोमनाथपूर भागात घडली.
बिलाल युसूफ बागवान (२३, रा. मुसानगर, उदगीर) व अतिक शब्बीर बागवान (१९, रा. आर.के. नगर, उदगीर) अशी मयत युवकांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, उदगीर- सोमनाथपूर रोडवरील संजय गांधी नगर भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. तिथेच शासनाची काही कार्यालयेही आहेत. त्या कार्यालयाच्या पूर्वेस डोंगरी भाग आहे. त्या ठिकाणी खदानी आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बिलाल युसुफ बागवान हा पोहोण्यासाठी गेला. परंतु, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला.
तेव्हा त्याला वाचविण्यासाठी सोबतचा अतिक शब्बीर बागवान हा पाण्यात उतरला. परंतु, दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना ग्रामीण पोलिसांना समजल्यानंतर उदगीर अग्निशमन दल व इतर नागरिकांच्या साह्याने त्या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी मोईज निजाम बागवान यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी व्यंकट सिरसे हे करीत आहेत.