खरीप हंगामाच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:14 AM2021-06-19T04:14:32+5:302021-06-19T04:14:32+5:30

लातूर : खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात आहेत. तसेच बियाणे, खतांचे नियोजन करण्यात ...

Accelerate the work of the kharif season | खरीप हंगामाच्या कामाला गती

खरीप हंगामाच्या कामाला गती

Next

लातूर : खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात आहेत. तसेच बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित असून, सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीविषयी मार्गदर्शन केले जात आहे. बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरवाढीने सामान्यांचे नियोजन कोलमडले

रेणापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले आहे. पेट्रोल १०३ रुपये, तर डिझेल ९० रुपयांच्या पुढे सरकले आहे. दरम्यान, डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातच महागाईने सर्वसामान्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शासनाने तत्काळ दरवाढ कमी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

बँकांनी कर्जपुरवठा करण्याची मागणी

तांदुळजा : खरीप हंगामामध्ये शेती मशागतीसह बियाणे, खते आदी खरेदीसाठी पैशांची गरज असते. कोरोनामुळे शेतमालाला बाजारपेठ न मिळाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्यांना तरी बँकांनी तत्काळ कर्जपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा

लातूर : जिल्ह्यातील १११ गावांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या वतीने अधिग्रहणासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. काही प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंजुरीही देण्यात आली आहे. सध्या २२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, अधिग्रहणाच्या उर्वरित प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

एसटी मालवाहतूक उपक्रमाला प्रतिसाद

अहमदपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आर्थिक उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील व्यापारी, शेतकऱ्यांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी आपला शेतीमाल एसटीच्या मालवाहतूक ट्रकद्वारे विक्रीसाठी नेत आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत मालवाहतुकीच्या माध्यमातून लातूर विभागाला पावणेदोन काेटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

वाहनधारक हैराण

लातूर : शहरातील एमआयडीसी भागातून कळंब रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यात पाणी साचत असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही.

विजेचा लपंडाव

चाकूर : तालुक्यातील डोंग्रज येथे विजेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे वीजपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी नागरिकांची अडचण होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

खरिपाची तयारी

जळकोट : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे अर्थचक्र कोलमडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजीपाल्यास मागणी

निलंगा : शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी होत असून, त्या तुलनेत मागणी अधिक आहे. त्यामुळे दरात किंचित वाढ झाली आहे. सोमवारपासून बाजारपेठ खुली होत आहे.

Web Title: Accelerate the work of the kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.