लातूर : विहिरीच्यासाठी १२ हजाराची लाच स्विकारणाऱ्या सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याला लातूरच्या एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे चाडगाव (ता. रेणापूर) येथे शेती असून, वडीलांच्या नावे राेजगार हमी याेजनेतून ५ मार्च २०२५ राेजी प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाचे अंदाजपत्रक चार लाखांचे हाेते. मात्र, १ एप्रिलपासून मजुरी दर वाढल्याने नव्या दरानुसार विहिरीचे इस्टिमेट पाच लाखांचे झाले आहे. त्यानुसार नवीन दरानुसार विहिरीचे अंदाजपत्रक वाढवून देण्याच्या कामासाठी, तसेच नरेगा साईटवर तक्रारदार यांच्या वडिलांच्या आडनावातील चुकीच्या दुरुस्तीसाठी १५ हजाराच्या लाचेची मागणी रेणापूर पंचायत समितीत कार्यरत असलेला सहायक कार्यक्रम अधिकारी ज्याेतिर्लिंग बाबुराव चिखले (वय ४३ रा. अग्राेया नगर, लातूर) याने केली हाेती. तडजाेडीअंती १२ हजार देण्याचे ठरले. याबाबत लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून १२ हजाराची लाच घेताना ज्याेतिर्लिंग चिखले याला रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई लातूरचे पाेलिस उपाधीक्षक संताेष बर्गे, पाेलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, पाेलिस निरीक्षक अन्वर मुजावर, फारुक दामटे, भागवत कटारे, भीमराव आलुरे, शाम गिरी, मंगेश काेंडरे, दिपक कलवले, गजानन जाधव, शाहाजान पठाण, शिवराज गायकवाड, असलम सययद, परवीन तांबाेळी, संताेष क्षीरसागर यांच्या पथकाने पार पाडली.