हलगरा येथे पुराच्या पाण्यात महिलेसह घाेडा गेला वाहून, दोघांचेही मृतदेह सापडले
By राजकुमार जोंधळे | Updated: September 6, 2022 16:57 IST2022-09-06T16:56:44+5:302022-09-06T16:57:22+5:30
एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम करण्यात आली असता दोघांचेही मृतदेह सापडले

हलगरा येथे पुराच्या पाण्यात महिलेसह घाेडा गेला वाहून, दोघांचेही मृतदेह सापडले
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हलगरा शिवारात साेमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला हाेता. दरम्यान, या पुराच्या पाण्यात हलगरा येथील एक महिला व सोबत असलेला घाेडा पाण्यात वाहून गेल्याची घटना साेमवारी सांयकळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. घाेडा मृतावस्थेत साेमवारी रात्री आढळून आला. तर महिलेचा मृतदेह शाेधकार्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता आढळून आला. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील हलगरा येथील रहिवासी महिला सालिया मुजायतुला माैजन (वय ४६) या शेतात गेल्या हाेत्या. दरम्यान, रविवार आणि साेमवारी झालेल्या मुसळधार पावसाने गावालगतच्या ओढ्याला माेठा पूर आला. सोमवारी सायंकळी ६ वाजण्याच्या सुमारास त्या घाेड्यासाेबत घराकडे निघाल्या हाेत्या. दरम्यान, गावानजीक आल्यानंतर त्यांना ओढ्याच्या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांनी या पाण्यातून गाव गाठवण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने घाेड्यासह त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. गावकऱ्यांनी महिला सालिया माैजन आणि सोबतच्या वाहून गेलेल्या घाेड्याचा शाेध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरानंतर गावकऱ्यांना मृतावस्थेत घाेडा आढळून आला.
रात्र झाल्याने शाेधकार्यात अडथळा...
साेमवारी रात्र झाल्याने शाेधकार्यात अडथळला आला. पुन्हा मंगळवारी सकाळपासून पाेलीस पथक आणि एनडीआरएफच्या पथकाने शाेधकार्य सुरु केले. हलगरा शिवारात ओढ्याकाठच्या गाळात सालिया माैजन यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन हलगरा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात करुन, ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पाेलीस हेड काॅन्स्टेबल लतिफ साैदागर, विश्वनाथ डाेंगरे यांनी दिली.