उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल
By संदीप शिंदे | Updated: October 28, 2023 17:30 IST2023-10-28T17:30:06+5:302023-10-28T17:30:44+5:30
अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील घटना

उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने 'दुष्काळ जगू देत नाही व आरक्षण शिक्षण घेऊ देत नाही' असे म्हणत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत किनगाव पोलिसात आकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य महेश बाबुराव कदम (वय २६) या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने फार मोठे नुकसान होत आहे. मराठवाड्यामध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ व आरक्षणाअभावी फीस भरणे शक्य नसल्याने दुष्काळ जगू देत नाही व आरक्षण शिक्षण घेऊ देत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत शनिवारी दुपारी १२.३० वाजता विषारी औषध प्राशन केले. त्यास उपचारासाठी अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. महेश कदम यांच्या पश्चात पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार असून, ढाळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
एमए बीएडचे झाले होते शिक्षण...
मयत महेश कदम यांनी मराठी आणि राज्यशास्त्र या दोन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. तसेच डीएड आणि बीएड या दोन्ही पदव्या घेतल्या होत्या. नोकरीसाठी प्रयत्नही केले. मात्र, यश आले नव्हते. ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळवून ते सदस्य झाले. उच्चशिक्षित असूनही संधी मिळत नाही याचे शल्य त्यांच्या मनात होते. मराठा आरक्षण असते तर कोठेतरी संधी मिळाली असती, अशी त्यांची भावना होती, असे नातेवाईकांनी बोलून दाखविले.