रोजगार हमीवरील मजुरांकडून घेतली नऊशे रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 17:57 IST2022-03-17T17:54:09+5:302022-03-17T17:57:03+5:30
एका तक्रारदाराने रोहयोअंतर्गत गोठा शेडच्या मजुरांचे ऑनलाइन हजेरीचे मस्टर भरण्याची मागणी केली.

रोजगार हमीवरील मजुरांकडून घेतली नऊशे रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा
उदगीर : रोहयोअंतर्गत गोठा शेडच्या मजुरांचे ऑनलाइन हजेरीचे मस्टर भरण्याच्या कामासाठी ९०० रुपयांची लाच मागून त्यापैकी ४०० रुपये घेतल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीसह उदगीर पंचायत समितीतील संगणक परिचालकावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका तक्रारदाराने रोहयोअंतर्गत गोठा शेडच्या मजुरांचे ऑनलाइन हजेरीचे मस्टर भरण्याची मागणी केली. तेव्हा आरोपी सतीश रोहिदास शिंदे (रा. शेकापूर, ता. उदगीर) याने मस्टर भरणारे उदगीर पंचायत समितीतील संगणक परिचालक प्रवीण कल्याणराव सताळे यांच्यासाठी ९०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यात सुरुवातीस ४०० रुपये आणि नंतर ५०० रुपये देण्याचे ठरले.
तेव्हा उपस्थित असलेल्या सताळे यांनी लाचेसाठी प्रोत्साहन दिले. ४०० रुपयांची लाच घेऊन खासगी व्यक्ती शिंदे यांनी सताळे यांना कळविले. तेव्हा सताळे यांनी लाच घेण्यास होकार दर्शविला. याप्रकरणी दोघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.