‘सुपरमून’भोवती दिसले नयनरम्य लुनर हॅलो ! खगोलीय घटना, चंद्राभोवती इंद्रधनुष्यासारखे कडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 00:43 IST2025-11-06T00:43:04+5:302025-11-06T00:43:39+5:30
सुपरमूनमध्ये चंद्र अधिक तेजस्वी असतो आणि त्या रात्री आकाशात वरच्या भागात बर्फाचे स्फटिक असलेले सिरस ढग असतील, तेव्हा चंद्राभोवती इंद्रधनुष्यासारखी वलयाकार कडा दिसते.

‘सुपरमून’भोवती दिसले नयनरम्य लुनर हॅलो ! खगोलीय घटना, चंद्राभोवती इंद्रधनुष्यासारखे कडे
लातूर : अर्धवर्तुळाकार दिसणारे इंद्रधनुष्य उंचावरून, विशेषत: विमानातून गोलाकार दिसू शकते. जसे सप्तरंगी गोलाकार इंद्रधनुष्य दिसावे, तशी चंद्राभोवतीची विलक्षण खगोलीय घटना मंगळवारी रात्री अनुभवयास मिळाली. वर्षातील सर्वात तेजस्वी आणि मोठ्या ‘बीव्हर सुपरमून’च्या भोवती स्पष्ट आणि आकर्षक वलय (लुनर हॅलो) तयार झाले होते. मंगळवारी रात्री चंद्र नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी होता. त्यामुळे चंद्राभोवतीचे गोल कडे (लुनर हॅलो) जमिनीवरून सहजपणे डोळ्यांनी अनुभवता आले. अशा चंद्रवलयाला पावसाचे संकेत असे मानले जाते.
सुपरमून आणि लुनर हॅलो काय आहे?
सुपरमूनमध्ये चंद्र अधिक तेजस्वी असतो आणि त्या रात्री आकाशात वरच्या भागात बर्फाचे स्फटिक असलेले सिरस ढग असतील, तेव्हा चंद्राभोवती इंद्रधनुष्यासारखी वलयाकार कडा दिसते. शिवाय, इंद्रधनुष्य आणि लुनर हॅलो या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इंद्रधनुष्य हे सूर्यप्रकाश आणि पावसाच्या पाण्याच्या थेंबांवर प्रकाश परावर्तन आणि रिफ्रॅक्शन होऊन तयार होते. ते जमिनीवरून अर्धवट वर्तुळाकारच दिसते. मात्र उंचीवरून विशेषत: विमानातून ते गोलाकार दिसते. लुनर हॅलो हे चंद्रप्रकाश आणि वरच्या वातावरणातील बर्फाचे स्फटिक असलेले सिरस ढग यामुळे दिसते, असे अभ्यासक प्रा.डॉ. महादेव पंडगे म्हणाले.
चंद्रवलयाचा अनुभव अद्भुत...
मंगळवारी रात्री खगोल अभ्यासकांना ‘बीव्हर सुपरमून’ पाहायला मिळाला. हा अद्भुत अनुभव कॅमेराबद्ध करणे विलक्षण अनुभव असून, ही दुर्मीळ घटना नसली, तरी योगायोगानेच घडते. चंद्राची प्रभावळ दिसते हे पावसाचे संकेत असतात, त्यासाठी कारणीभूत असणारे विशिष्ट ढग बऱ्याचदा उष्ण हवामानापूर्वी येतात. जे की पाऊस, वादळासाठी सूचक असतात, असे अभ्यासक प्रा.डॉ. अजय महाजन यांनी सांगितले.