ग्रामीण रुग्णालयाला ९० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST2021-07-07T04:25:26+5:302021-07-07T04:25:26+5:30
शिरूर अनंतपाळ : येथील ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाच्या वतीने ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालय पूर्ण ...

ग्रामीण रुग्णालयाला ९० लाखांचा निधी
शिरूर अनंतपाळ : येथील ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाच्या वतीने ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होऊन सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ५ कोटी ७२ लाख रुपयांच्या अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून रखडलेले ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज लवकरच सुरू होईल.
शिरूर अनंतपाळ येथे सात वर्षांपूर्वी येथील आरोग्य केंद्राच्या बाजूस साडेचार कोटी रुपये खर्च करून टोलेजंग इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु सात वर्षे उलटून गेली तरी ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. केवळ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पण रुग्णालयाच्या अंतर्गत कामासाठी निधीची तरतूद होऊ शकली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यानी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शिरूर अनंतपाळच्या ग्रामीण रुग्णालयास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यासाठी ५ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करता यावे म्हणून पहिल्या टप्प्यात ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कित्येक वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगितले.
औरादमध्ये ग्रामीण रूग्णालय...
औराद शहाजानी येथेसुध्दा ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यासाठीही ९० लाखांची तरतूद करण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.