८५ वर्षीय आजीबाईंची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:27+5:302021-05-04T04:09:27+5:30
उदगीर तालुक्यातील गुडसूर येथील पद्मीनबाई गणपतराव सुरवसे यांना १५ एप्रिल रोजी अचानक अशक्तपणा, मळमळ जाणवू लागली. त्यामुळे त्या दवाखान्यात ...

८५ वर्षीय आजीबाईंची कोरोनावर मात
उदगीर तालुक्यातील गुडसूर येथील पद्मीनबाई गणपतराव सुरवसे यांना १५ एप्रिल रोजी अचानक अशक्तपणा, मळमळ जाणवू लागली. त्यामुळे त्या दवाखान्यात गेल्या. अशक्तपणा कमी होईल म्हणून त्यांनी सलाईन लावून घेतले. परंतु, काही फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी डाॅ. आकाश पवार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. १७ एप्रिल रोजी आजीबाईंची कोविड चाचणी झाली. तसेच सिटीस्कॅनही करण्यात आले. स्कोर १५ ते २५ आल्याने कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली.
कुठल्याही रुग्णालयात खाटा उपलब्ध नव्हत्या. रात्री १२.३० वा.च्या सुमारास त्यांना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑक्सिजन खाट मिळाली आणि उपचारास सुरुवात झाली. १९ एप्रिल रोजी त्यांचा अहवाल आला आणि तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कुटुंबीयांची आणखीन चिंता वाढली. कारण त्यांना उच्चरक्तदाब होता.
दरम्यान, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी योग्य ते उपचार केले. आवश्यकतेनुसार रेमडेसिविरसह अन्य औषधोपचार केले. त्यामुळे १ मे रोजी त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने डॉक्टरांनी रुग्णालयातून सुट्टी दिली.
शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवत आईवर उपचार करण्याची विनंती केली. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. आम्हाला धीरही दिला. आईची काळजी आम्ही घेतो, तुम्ही निश्चिंत राहा, म्हणून बळ दिले. योग्य उपचार व दिलेल्या सल्ल्यामुळे माझी आई ठणठणीत होऊन घरी आली आहे. प्रत्येक रुग्णांशी आस्थेवाईकपणे डॉक्टर मंडळी चौकशी करून सेवा देतात, असे तुकाराम सुरवसे यांनी सांगितले.
तात्काळ निदान...
त्रास होऊ लागल्याने मुलांनी मला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेवर चाचणी केल्याने निदान होण्यास आणि उपचार करण्यास मदत झाली. त्यामुळेच आज मी ठणठणीत झाले आहे, असे पद्मीनबाई सुरवसे यांनी सांगितले.