शिरुर अनंतपाळ तालुक्यात खरिपाची ८० टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:38+5:302021-07-11T04:15:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगाम पेरणीचे दोन टप्पे पडले आहेत. सुरुवातीला मृगात दमदार ...

शिरुर अनंतपाळ तालुक्यात खरिपाची ८० टक्के पेरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगाम पेरणीचे दोन टप्पे पडले आहेत. सुरुवातीला मृगात दमदार पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. परंतु, मध्यंतरी पावसाने १५ दिवस दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी चाढ्यावरील मूठ थांबवली होती. गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत २६ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला असून, ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ३८४ हेक्टर खरिपासाठी लागवडीचे क्षेत्र आहे. मृगातील पेरण्या निरोगी असतात म्हणून बहुतांश शेतकऱ्यांचा मृगाच्या मुहूर्तावर कल असतो. यंदा मृग सुरू होताच पावसाने दोनदा दमदार हजेरी लावली. ९४ मिमी पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या कंपनीचे खत आणि बियाणे खरेदी करुन पेरणीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु, जूनच्या मध्यावधीत पावसाने १५ दिवस उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. कोवळी पिके दुपार धरू लागली. शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या.
उजेड, साकोळ महसूल मंडलातील काही गावांमध्ये पेरणीला प्रारंभही झाला नाही. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मोठा पाऊस झाला नसला तरी चार दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. ब्रेक लागलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात झाली आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी २६ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे.
सोयाबीन २२ हजार हेक्टरवर...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जमीन सोयाबीन उत्पादकतेसाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे यंदा २८ हजार ३८४पैकी २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत २६ हजार हेक्टरपैकी २२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यंदा तालुक्यात ३ हजार ७५० हेक्टरवर तुरीचा पेरा करण्याचे नियोजन होते. त्यापैकी आजपर्यंत २ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे. हायब्रीड, उडीद, मुगाची पेरणी करण्यात आली आहे.
सरासरी २२६.२ मिमी पाऊस...
तालुक्यात आतापर्यंत सरासरी २२६.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. खरिपाच्या २८ हजार ३८४ हेक्टरपैकी २६ हजार हेक्टरवर आजपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, अद्याप २० टक्के पेरण्या सुरू असल्याचे कृषी अधिकारी संजय नाबदे, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.