प्राध्यापकाचे अपहरण करुन ८ लाख उकळले; कर्नाटकात दिले सोडून
By हरी मोकाशे | Updated: October 18, 2023 19:21 IST2023-10-18T19:18:34+5:302023-10-18T19:21:42+5:30
याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्राध्यापकाचे अपहरण करुन ८ लाख उकळले; कर्नाटकात दिले सोडून
उदगीर : ५० लाखासाठी शहरातील एका प्राध्यापकाचे चौघांनी अपहरण करुन जबरदस्तीने ८ लाख १४ हजार काढून घेतले. तसेच धनादेश, बॉन्डवर स्वाक्षऱ्या घेऊन कर्नाटकातील भालकी येथे सोडून दिले. याप्रकरणी प्राध्यापकाच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलिसांत चौघांविरुध्द अपहरण, खंडणीचा बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रा. सदाविजय बसवप्रकाश विश्वनाथे (३२, रा. कल्पना चौक, उदगीर) यांना आरोपी गफार इस्माईल पठाण उर्फ बबलू पठाण (रा. समतानगर, उदगीर), पवन बिरादार शिरोळकर, बालाजी व अनोळखी इसम यांनी आपसात संगनमत केले. या चौघांनी सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शहरातील बिदर गेट येथून फिर्यादीचे अपहरण केले. त्यांना सुरुवातीला लातूर, औराद शहाजानी येथे नेऊन प्लॉस्टिक पाईप व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फियादीकडे ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच फियादी व त्याच्या मित्रांकडून ऑनलाईन पध्दतीने बळजबरीने पैसे मागवून घेतले. तद्नंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यास फिर्यादीस भाग पाडले. एकूण ८ लाख १४ हजार रोख काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या बॉन्ड खरेदी व बँकेच्या चेकवर सह्या घेतल्या.
ही घटना घरातील मंडळींना सांगितल्यास जीवे मारु अशी धमकी देत शेजारच्या कर्नाटक राज्यातील भालकी येथे सोडून दिले. याप्रकरणी विश्वनाथे यांच्या फिर्यादीवरुन वरील चार आरोपींविरुध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत.