३५०४ जागांसाठी ७१०० अर्ज; आयटीआयकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:22+5:302021-08-26T04:22:22+5:30
लातूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांकडे सर्वाधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत औद्योगिक ...

३५०४ जागांसाठी ७१०० अर्ज; आयटीआयकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल !
लातूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांकडे सर्वाधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात ३ हजार ५०४ जागांसाठी ७ हजार १०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. दरम्यान, अद्यापही अर्ज प्रकिया सुरूच असल्याने विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात ११ शासकीय, तर ८ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. दोन्ही संस्था मिळून ३ हजार ५०४ जागा आहेत. प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. दाेन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तत्काळ नोकरीची संधी असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही अर्जात वाढ झाली आहे.
अर्ज स्थिती - एकूण जागा - ३५०४
आलेले अर्ज - ७१००
जिल्ह्यात आयटीआय - ११ शासकीय
०८ खासगी
प्रवेश क्षमता - शासकीय - २८००
खासगी ७०४
विद्यार्थी म्हणतात...
आयटीआय केवळ दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. नोकरीच्या संधी असल्याने आयटीआयला प्रवेश घेण्याचे नियोजन आहे. टर्नर, फिटरला पसंती असून, अर्ज भरला आहे. गुणवत्ता यादी कधी जाहीर होते याची प्रतीक्षा लागली आहे.
- फैजोद्दीन खतीब
विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांकडे सर्वांचा ओढा असतो. मात्र, आयटीआय केल्यावरही नोकरीच्या संधी आहेत. त्यामुळे या वर्षी आयटीआयला प्रवेश घेण्याचे निश्चित केले असून, अर्जही भरला आहे.
- नरेश चोले
म्हणून वाढला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...
गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आयटीआयकडे प्रवेशाला पसंती देत आहेत.
- प्रा. सारिका जटाळ
शासकीय, खासगी, महावितरण, एस.टी. महामंडळ या संस्थांमध्ये आयटीआय केलेल्यांना नोकरीच्या संधी असतात. अनेक विद्यार्थी आयटीआय झाल्यावरही शिक्षण सुरूच ठेवतात. त्यामुळे आयटीआयकडे प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. - सतीश सातपुते
गतवर्षीपेक्षा प्रतिसाद वाढला...
मागील वर्षी कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले.
या वर्षी दहावीची परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. गुण जास्त असल्याने आयटीआय प्रवेशासाठी स्पर्धा असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असल्याने आतापर्यंत सात हजार १०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
एकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आयटीआयकडे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज आले आहेत.