उदगीर तालुक्यात ७० टक्के खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:48+5:302021-06-25T04:15:48+5:30

तालुक्याचे ६६ हजार हेक्टर खरिपाच्या पेरणीयोग्य क्षेत्र आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील शेतकरी ...

70% kharif sowing in Udgir taluka | उदगीर तालुक्यात ७० टक्के खरिपाच्या पेरण्या

उदगीर तालुक्यात ७० टक्के खरिपाच्या पेरण्या

तालुक्याचे ६६ हजार हेक्टर खरिपाच्या पेरणीयोग्य क्षेत्र आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या कामाला जोमाने लागले होते. त्यानंतर मात्र पावसाने तालुक्यात सर्वत्र उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चावडीवरची मूठ थांबली होती. परंतु, बुधवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पडलेल्या भिज पावसामुळे शेतकरी पुन्हा गुरुवारपासून पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरलेल्या काही शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगवणसुद्धा झाली आहे. त्या पिकालासुद्धा पावसाची नितांत गरज होती. यंदा तालुक्यात सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी झाली असल्याचा अंदाज आहे. त्या खालोखाल तूर, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांचे क्षेत्र असणार आहे. यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा वेगाने होणाऱ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली आहे. टाळेबंदी असल्याने बाजारात सोयाबीनच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून आली.

उदगीर मंडळात सर्वाधिक पाऊस...

तालुक्यात आतापर्यंत उदगीर मंडळात सर्वात जास्त पाऊस पडला आहे, तर तोंडार मंडळात सर्वात कमी पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. तालुक्यात गुरुवारी सकाळपर्यंत मंडळनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद आहे. उदगीर २२ (३७२), नागलगाव २२ (२५३), मोघा २० (२९२) हेर ३३ (१९२) वाढवणा १७ (२२२), नळगीर ३० (३२९), देवर्जन १९ (२१९), तोंडार २६ (१९१) असा पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वच मंडळांत शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

Web Title: 70% kharif sowing in Udgir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.