जिल्ह्यातील ७ रक्तपेढ्यांमध्ये आठवडाभर पुरेल एवढाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:45+5:302021-04-04T04:19:45+5:30
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. सध्या तर कोरोनाचा आलेख उंचावत आहे. गेल्या वर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ...

जिल्ह्यातील ७ रक्तपेढ्यांमध्ये आठवडाभर पुरेल एवढाच साठा
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. सध्या तर कोरोनाचा आलेख उंचावत आहे. गेल्या वर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिक गावाकडे आल्याने आणि त्यांनी समाजात जनजागृती केल्याने रक्तदानाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे तुटवडा जाणवणे कमी झाले होते.
कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याचबरोबर कोराेनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यापासून २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करावे, अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचा परिणाम रक्त संकलनावर झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट येण्यापूर्वी प्रत्येक रक्तपेढ्यांत महिन्याकाठी २०० ते ३०० रक्त पिशव्यांचे संकलन होत असे. मात्र, आता ५० ते ६० रक्त पिशव्या संकलित होत असल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये चांगल्या प्रमाणात रक्तसाठा झाला होता. मात्र, हा रक्तसाठा केवळ आठवडाभर पुरेल एवढाच असल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शासकीय रक्तपेढीत चार दिवसांचा साठा...
कोरोनाच्या संकटापूर्वी शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रक्तपेढीत महिन्याकाठी ३०० ते ४०० रक्तपिशव्यांचे संकलन होत असे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणामुळे रक्त संकलनाचे प्रमाण ४० ते ५० वर येऊन पोहोचले आहे. चार दिवस पुरेल एवढाच साठा आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करणे तसेच युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. उमेश कानडे यांनी सांगितले.
माऊली ब्लड बँक...
गेल्या वर्षी दर महिन्यास ४०० ते ५०० पिशव्या रक्त संकलन होत असे. मात्र, आता संकलनाचे प्रमाण निम्यापेक्षा कमी झाले आहे. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. त्यामुळे रक्तपुरवठा करणे शक्य होईल, असे माऊली ब्लड बँकचे अध्यक्ष उमाकांत जाधव यांनी सांगितले.
डॉ. भालचंद्र ब्लड बँक...
पूर्वी २०० ते ३०० जण दर महिन्यास रक्तदान करीत असत. आता रक्तदानाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. शिवजयंती, काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरांमुळे काही प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला आहे, असे डॉ. भालचंद्र ब्लड बँकेकडून सांगण्यात आले.
श्रीमती सरस्वती कराड ब्लड बँक...
कोरोनाच्या संकटापूर्वी महिन्यास २०० ते ३०० पिशव्या रक्त संकलित होत असे. आता हे प्रमाण ४० ते ५० वर येऊन पोहोचले आहे. ७ ते ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असून मागणी वाढली आहे. रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक ठरत असल्याचे ब्लड बँकेकडून सांगण्यात आले.
लसीकरणाअगोदर करा रक्तदान...
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार कोविड लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. त्यामुळे लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. रक्तदानासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक संस्थांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. युवकांनीही रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. तसेच विविध सोसायट्यांनी आपल्या भागात रक्तदान शिबिर घेतल्यास त्याचा काही प्रमणात फायदा होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.