चापोलीतील ५१ शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:48+5:302021-08-14T04:24:48+5:30

चापोली : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू होऊन दीड वर्षे उलटले. मात्र, चापोलीतील ५१ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित ...

51 farmers in Chapoli waiting for debt relief | चापोलीतील ५१ शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत

चापोलीतील ५१ शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत

चापोली : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू होऊन दीड वर्षे उलटले. मात्र, चापोलीतील ५१ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहे, तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील शेतकरी हे चार वर्षांपासून सतत संकटांचा सामना करीत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोविडचे संकट सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत यंदा शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांचेही उंबरठे झिजवावे लागले. तत्कालीन महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली होती. मात्र, त्यातील जाचक अटींमुळे बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी माफीच्या रकमेपेक्षा अधिक असलेली कर्ज रक्कम बँकेला भरणे अनिवार्य होते. त्यामुळे या योजनेपासून बहुतांश शेतकरी वंचित राहिले.

त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. २ लाखांपर्यंत थकीत असलेले पीककर्ज आणि पुनर्गठित पीककर्ज या मर्यादा आणि १ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०१९ अशी कालमर्यादा ठेवण्यात आली. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरण्यास सुरुवात केली. त्यासाठी याद्या तयार करण्यात आल्या.

प्रसिद्ध यादीत चापोलीसह परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एकूण ३९६ शेतकरी कर्जमुक्तीस पात्र होते. त्यात ३४५ थकबाकीदार शेतकरी पात्र होते. त्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्तीचे १ कोटी ५९ लाख ५७ हजार २६० रुपये जमा झाले आहे. त्यातील ३७६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले, तर २० शेतकऱ्यांनी केले नाही. शिल्लक पात्र ५१ थकबाकीदार शेतकरी हे कर्जमुक्तीसाठी पात्र असूनही अद्यापही त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही.

प्रोत्साहनपर अनुदान द्यावे...

महाविकास आघाडी सरकारने २ लाखापर्यंतचे थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती दिली. या योजनेच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे घोषित केले. मात्र, चापोलीसह परिसरातील ७४५ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही.

अजूनही कर्जमुक्ती नाही...

माझे कर्जमुक्तीसाठीच्या याद्यात नाव होते. आधार प्रामाणिकरणही केले. मात्र, पीककर्जमुक्तीची रक्कम माझ्या बँक कर्ज खात्यात अद्याप जमा झाली नाही. कर्जमुक्तीची योजनेला दोन वर्षे होत आहेत, परंतु अजून कर्जमुक्ती झाली नाही. किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- बाबुराव तरगुडे, शेतकरी, चापोली.

Web Title: 51 farmers in Chapoli waiting for debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.