गेल्या २० दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासकीय, खाजगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. याबाबत शासकीय आणि खाजगी कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली असता या निर्णयाचा कर्मचा-यांना विसर पडल्याचेच चित्र आहे. प्रारंभी, प्रत्येक शासकीय कार्यालयात थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा वापर केला जात होता. मात्र, आता प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नसून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष आहे. मार्च एन्ड असल्याने सर्वसामान्य नागरिक कामे पुर्ण करण्यासाठी शासकीय, खाजगी कार्यालयात कामे घेऊन जात आहेत. मात्र या ठिकाणी शासनाच्या नियमालाच खो घातला जात आहे.
मनपा कार्यालय...
बुधवारी सकाळी ११.३० वाजेदरम्यान महापालिकेच्या कार्यालयाच्या खाली कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. मार्च एन्ड असल्याने १०० टक्के कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे तीन-तेरा वाजले होते. अनेकांच्या चेह-यावर मास्क खाली उतरलेले दिसले. तर कार्यालयातही प्रत्येक टेबलाजवळ नागरिकांची वर्दळ दिसून आली.
रजिस्ट्री कार्यालय...
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात नागरिकांची झुंबड पहावयास मिळाली. रजिस्ट्रीच्या कामासाठी आलेले अनेकजण कोरोनाचे नियम पाळताना दिसले नाहीत. फिजीकल डिस्टन्स व मास्कचा फज्जा उडाल्याचे चित्र याठिकाणह पहावयास मिळाले. कार्यालयाच्या बाहेरही अनेकजण गर्दी करत असल्याचे चित्र होते.
जिल्हा परिषद...
जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात १०० टक्के कर्मचा-यांची उपस्थिती दिसली. १२ वाजेनंतर नागरिकांची कामासाठी विविध विभागात वर्दळ दिसून आली. कार्यालयीन कर्मचारी मास्कचा अवलंब करीत असले तरी काम घेऊन आलेले नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र होते. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा अभाव दिसून आला.
कार्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक म्हणतात...
मनपा - मार्च एन्ड असल्यामुळे कराचा भरणा करण्यासाठी आलो आहे. दुपारच्या वेळी गर्दी असल्याने सकाळीच नंबरला लागलो. याठिकाणी अनेकजण विनामास्क फिरत आहेत. याकडे मनपाच्या अधिका-यांचे दुर्लक्षा आहे. - नागरिक
रजिस्ट्री कार्यालय - अनेक दिवसांपासून रजिस्ट्री रखडली आहे. आज काम पुर्ण करायचे असल्याने कार्यालयात आलो आहे. या ठिकाणी अनेकजण कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मी स्वत: मास्क, सॅनिटाझर सोबतीला घेऊन रजिस्ट्रीसाठी आलो आहे. - नागरिक
जिल्हा परिषद - कामानिमित्त जिल्हा परिषदेत आलो आहे. या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी मास्कचा अवलंब करीत आहेत. मी स्वत: नियमांचे पालन करत आहे. मात्र, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आणि सुरक्षा रक्षकांचे विनामास्क फिरणा-यांकडे दुर्लक्ष आहे.