पाच लाखांची घरफाेडी; दागिन्यासह राेकड लंपास
By राजकुमार जोंधळे | Updated: October 20, 2023 20:38 IST2023-10-20T20:37:49+5:302023-10-20T20:38:13+5:30
पहाटेची घटना, साखरझाेपेत असताना घर साफ

पाच लाखांची घरफाेडी; दागिन्यासह राेकड लंपास
राजकुमार जाेंधळे, डाेंगरशेळकी (जि. लातूर): घरातील मंडळी साखरझाेपेत असताना चाेरट्यांनी घरच साफ केल्याची घटना डाेंगरशेळकी (ता. उदगीर) येथे पहाटेच्यसा सुमारास घडली. साेन्याच्या दागिन्यासह राेख रक्कम असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे पहाटेच्या वेळी माराेती जयराम घुळे (वय ६१) यांच्यासह घरातील मंडळी साखरझाेपेत हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून, कपाटात ठेवण्यात आलेली राेख रक्कम २५ हजार रुपये, चार ताेळ्यांचे गंठण, एक ताेळ्याचे मिनी गंठण, साेन्याची अंगठी असा जवळपास ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सध्या ग्रामीण भागात नवरात्राेत्सवानिमित्त रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दरम्यान, पहाटेच्या वेळी नागरिक साखरझाेपेत असताना चाेरट्यांनी हे घर साफ केले आहे. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक भीमराव गायकवाड करत आहेत.