चाकूर पंचायत समितीत ४७ कर्मचारी अनुपस्थित, तहसीलदारांनी केला पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:43+5:302021-07-30T04:20:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकूर : येथील पंचायत समिती कार्यालय सकाळी ९.४५ वाजता उघडणे आवश्यक असताना गुरुवारी सकाळी १०.२०पर्यंत कार्यालयातील ...

चाकूर पंचायत समितीत ४७ कर्मचारी अनुपस्थित, तहसीलदारांनी केला पंचनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकूर : येथील पंचायत समिती कार्यालय सकाळी ९.४५ वाजता उघडणे आवश्यक असताना गुरुवारी सकाळी १०.२०पर्यंत कार्यालयातील ४७ अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे चाकूर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत तहसीलदारांकडे तक्रार केली. त्यामुळे तहसीलदारांनी तलाठ्यांकडून पंचनामा केला.
तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, कार्यालयात बायोमेट्रिक मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी चाकूर संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी प्रत्येक कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले. तसेच बायोमेट्रिक मशीन बसविण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही आदेश दिले. परंतु, या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चाकूर संघर्ष समितीचे सुधाकरराव लोहारे, ॲड. एम. जी. जवादे, अजय धनेश्वर, ओमप्रकाश लोया, व्ही. बी. कांबळे, सागर होळदांडगे, शिवलिंग गादगे, अभिजीत कामजळगे, योगेश पाटील, अनिल महालिंगे, मंगेश स्वामी, शिवकुमार सोनटक्के आदी गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता पंचायत समितीत गेले असता, १०.२०पर्यंत एकूण ५६ अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी १९ जणच उपस्थित होते. त्यामुळे संघर्ष समितीने ठिय्या मांडत तहसीलदारांना माहिती दिली.
तहसीलदार डॉ. बिडवे यांनी तलाठी बालाजी हाके यांना पाठवून पंचायत समिती कार्यालयातील परिस्थितीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. तलाठ्यांनी १२ वाजेपर्यंत पंचनामा केला. त्यावेळी एकूण ४७ जण अनुपस्थित होते. तलाठ्यांनी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहण्याचे कारण विचारले, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही. यावेळी गटविकास अधिकारीही अनुपस्थित होते.
कारवाई करावी...
तालुक्यातील ९० टक्के अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. तसेच उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करावी, मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
- सुधाकरराव लोहारे, चाकूर संघर्ष समिती.
कारवाईचा प्रस्ताव सादर...
चाकूर पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा पंचनामा करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी व ४७ कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.
कारणे दाखवा नोटीस...
पंचायत समिती कार्यालयातील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढल्या आहेत. कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचे आदेश दिले आहेत.
- वैजनाथ लोखंडे, गटविकास अधिकारी.
गंभीर बाब...
पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे ही गंभीर बाब आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.
- राहुल केंद्रे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.
बायोमेट्रिक सुरु का नाहीत...
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील बायोमेट्रिक मशीन बंद पडल्या आहेत. त्या का बंद पडल्या आहेत. नंतर सुरू का झाल्या नाहीत, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
- वसंतराव डिगोळे, माजी उपसभापती, पंचायत समिती