हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:55+5:302021-07-14T04:22:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० ...

445 women persecuted for dowry even after dowry ban law. | हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ ।

हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ ।

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० वर्षांपू्र्वी देशात हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याला २० मे १९६१ राेजी राष्ट्रपतींची अनुमती मिळाली आणि हा कायदा १ जुलै १९६१ राेजी लागू झाला. अर्थात १ जुलै २०२१ राेजी हा कायदा साठ वर्षांचा झाला. कायद्याच्या साठीनंतरही लातूर जिल्ह्यात तब्बल ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे पाेलीस दप्तरी नाेंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरुन समाेर आले आहे. धक्कादायक म्हणजे... यातील १४ महिलांचा हुंडाबळी गेला आहे. लातूरसह जिल्ह्यातील एकूण २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये जानेवारी २०१९ ते जून २०२१ या अडीच वर्षांच्या कालावधीत माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये ५३६ आणि जानेवारी ते जून २०२१ अखेर २८३ घटनांची नाेंद झाली आहे. ‘लाॅकडाऊन’मध्येही महिलांच्या छळांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनलाॅकमध्ये ‘भराेसा सेल’कडे तब्बल ५३८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील अनेक प्रकरणांत महिला तक्रार निवारण केंद्राच्यावतीने सुनावणी अन् समुपदेशन करण्यात आले आहे. यातून घटस्फाेटाच्या उंबरठ्यावर असलेल्या जाेडप्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ प्रकरणांची लातूरच्या भराेसा सेलने चाैकशी केली आहे. यात १६९ प्रकरणांत तडजाेड झाली असून, ३२३ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे तर ५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हुंड्याबाबत मानसिकता कायम...

माहेरची परिस्थिती हालाखीची... आई-वडील माेलमजुरी करुन प्रपंच चालविणारे... अशास्थितीत सासरकडून विवाहितेचा हुंड्यासाठी छळ... या विचित्र काेंडीत अडकलेल्या महिला वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळतात. तर काही महिला धाडस करत पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. यातून हुंडा आणि छळाची व्याप्ती समार येते. हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही सासरच्या मंडळींची मानसिकता बदलायला तयार नाही, हेच यातून समाेर आले आहे.

समुपदेशन आणि कायदेशीर सल्ला...

क्षुल्लक कारणावरुन सासरी विवाहितेचा छळ हाेताे. त्यातच पती-पत्नीत यातून बेबनाव निर्माण हाेताे. मग सुखी संसारात वादाची ठिणगी पडते आणि घटस्फाेटापर्यंत निर्णय हाेताे. अशावेळी महिलांचे मानसिक खच्चीकरण हाेते. त्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्राच्या ‘भराेसा सेल’कडून आधार दिला जाताे. त्यांचे समुपदेशन केले जाते, कायदेशीर सल्लाही दिला जाताे. हुंड्यासाठी हाेणारा छळ महिला सहन न करता, कायद्याचा आधार घेत बंड करतात.

- दीपा गीते, सहाय्यक पाेलीस निरीक्षक, लातूर

Web Title: 445 women persecuted for dowry even after dowry ban law.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.