तिरू प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा; प्रकल्प भरण्यासाठी दमदार पावसाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:22+5:302021-08-24T04:24:22+5:30
यंदा हवामान खात्याने १०० टक्के पाऊस पडेल असे भाकीत केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मृग नक्षत्रातच पावसाने आशादायी ...

तिरू प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा; प्रकल्प भरण्यासाठी दमदार पावसाची गरज
यंदा हवामान खात्याने १०० टक्के पाऊस पडेल असे भाकीत केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मृग नक्षत्रातच पावसाने आशादायी सुरुवात केली. त्यामुळे खरिपाच्या पेरणीस गती मिळाली. पुढे पिकांपुरता पाऊस पडत गेला. मात्र, मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. जेमतेम पावसाने पिके तरारली असली तरी जलसाठ्यात वाढ होण्यासाठी हाळी हंडरगुळी परिसरात अद्यापही मोठ्या पावसाची गरज आहे.
हाळी हंडरगुळी परिसरातील तिरू प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान मानला जातो. १९७६ साली हा प्रकल्प अस्तित्वात आला. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३.३२ दलघमी इतकी आहे. त्यामुळे परिसरातील दोन हजार पंचावन्न हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा असणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे.
पाणीटंचाई होण्याची भीती...
हाळी हंडरगुळी गावासह परिसरातील वाढवणा(बु.), वाढवणा (खु.), सुकणी, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, शिरूर ताजबंद आदी गावांना या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते. शिवाय ५२ खेडी पाणी योजना ही याच प्रकल्पावरून कार्यान्वित आहे. आगामी काळात हाळी हंडरगुळी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्यास प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होईल. अन्यथा पाणी योजना चालणे कठीण आहे.